नागपूर : देवस्थान म्हटले की पूजा सामान विक्रेत्यांचा गोंगाट आलाच. भाविकांची गर्दी असणाऱ्या प्रत्येक देवस्थानाबाहेर विक्रेत्यांची नको तितकी चढाओढ अनेकदा डोके उठवणारी असते.आदासा येथील गणेश मंदिराची सुद्धा हीच गत होती. आदासा मंदिरात दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी उसळते. आता एक मोठा फरक भाविकांना सुखावतो आहे. तो म्हणजे पूजा सामान विक्रेत्यांचा गोंगाट आता नाहीये. मंदिर समितीने या विक्रेत्यांसाठी आता टोकण सिस्टीम सुरू केली आहे. मंदिर प्रांगणात पूजा सामग्रीची विस दुकाने आहेत.त्यांना एक ते वीस असे क्रमांक देऊन त्याचे टोकण तयार करण्यात आले आहेत. सर्व दुकाने एका कुंपणात असून दारावर टोकण वाटणारे बसतात. येणाऱ्या भाविकांना ज्या दुकानाचे टोकण मिळेल त्या दुकानात जाऊन खरेदी करावी अशी ही व्यवस्था आहे.
दुकानदार मोठ्याने ओरडून गिऱ्हाईक खेचण्याचा प्रयत्न करायचे. अनेकदा या चढाओढीत दुकानदारांमध्ये भांडणेही व्हायची. यामुळे परिसराला भाजी बाजाराचे स्वरूप यायचे. आजही ही परिस्थिती कोराडी व इतर अनेक देवस्थानांपुढे बघायला मिळते. उपजिविकेसाठी दुकानदारांची केविलवाणी उठाठेव भाविकांना मनस्ताप देणारी ठरते. या नव्या व्यवस्थेमुळे ते ओशाळवाने चित्र आता पालटले आहे. परंतु, एक नवी समस्या या व्यवस्थेने भाविकांसाठी तयार केली आहे. टोकण व्यवस्थेमुळे मोजके ग्राहक दुकानावर येत असल्याने प्रत्येक दुकानदार आता प्रत्येक ग्राहकाला पूजेचे महागातील महाग ताट घेण्याचा आग्रह करतो. दुर्वाची एक जुडी, किंवा गुलाबाचे एक फुल बाप्पाला वाहायचे असेल तर आता ते घरूनच नेलेले बरे.
हेही वाचा >>>नागपूर: डॉक्टर-आरोग्य कर्मचारीही डोळ्यांच्या साथीच्या विळख्यात!
हेही वाचा >>>नागपूर: येथे वाघ जंगलात नाही, खाणीत राहतात; वाघ गाडीसमोर आला, अनं….
शेषराव धोटे आणि प्रभा ठाकूर हे टोकण प्रणाली सांभाळणारे कार्यकर्ते सांगतात की नव्या व्यवस्थेबद्दल भाविकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. गोंगाट संपला म्हणून काही लोक आनंद व्यक्त करतात. पूजा महाग पडतेय म्हणून काही नाकही मुरडतात, शेषराव म्हणाले. या व्यवस्थेमुळे देवस्थानांना शोभणारी शालीनता व शांतता येथे राहील, अशी भावना बहुतांश भाविकांनी व्यक्त केली. आदासा मंदिरापूर्वी कोराडी येथील महालक्ष्मी मंदिर व तेथील नवाकोरा रामायण हॉल फिरून आलेल्या एक भाविकाने मत व्यक्त केले की ही व्यवस्था कोराडीला सुद्धा असावी. आजघडीला कोराडी मंदिरात दिसणारी एकमात्र समस्या म्हणजे दुकानदारांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आर्त आरोळ्या होय, ते म्हणाले.