भंडारा : जिल्ह्यात हुंडाबळीची एकही घटना नोंद नाही ही अभिमानाची बाब आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. मात्र, अगदी आठवडाभरा पूर्वीच तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील एका विवाहितेने हुंड्यासाठी दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असताना प्रशासनाने चुकीची माहिती देवून राज्य महिला आयोगाची दिशाभूल केल्याची चर्चा आहे.
माहेरून पैसे आणण्याकरिता दररोज पती व सासूकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून १४ एप्रिलच्या रात्री हिमाक्षी सतिष बेलेकर (२६) रा. कुंभार टोली देव्हाडी या विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिमांशीचा पती आणि सासूला २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं
हिमाक्षी सतीश बेलेकर रा. कुंभारटोली देव्हाडी हिच्या मृत्युप्रकरणी तिचे वडील हेमराज सूक्कल गजभिये रा. नागपूर यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी हिमाक्षीचे पती सतिष देविदास बेलेकर (३०) व सासू रत्नमाला देविदास बेलेकर (६०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लग्नानंतर माहेरहून पैसे व दागिने आणण्यासाठी ते हिमाक्षीचा सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे हिमाक्षीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पती सतिष व सासू रत्नमाला बेलेकर यांच्यावर कलम ४९८ (अ), ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी काल २० एप्रिल रोजी दोघांनाही पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
हुंडाबळीची ताजी घटना असताना महिला आयोगापासून ही माहिती लपवून प्रशासन काय साध्य करत आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.