नागपूर : विदर्भातील दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी राज्य शासनाने गुरुवारी मोठे निर्णय घेतले. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अंभोरा पर्यटन स्थळाच्या विकासाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जल पर्यटन केंद्र तयार करण्यात येत आहे. त्यासाठी १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार गोसीखुर्द जलाशय परिसरात सदर प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून (पीपीपी) होणार आहे.
हेही वाचा – आयटीआयचे विद्यार्थी आता शिकणार महापुरुषांचे कौशल्य विचार; अभ्यासक्रमात समावेश
अंभोरा विकास आराखड्याला मान्यता
कुही तालुक्यातील अंभोरा पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी २४८ कोटींच्या आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ७४ कोटी ४० लाखांचा निधी वितरीत केला जाणार आहे. अंभोरा येथे आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. आता अंभोरा पर्यटन विकास दोन टप्प्यांत होणार आहे. बांधकामादरम्यान सिमेंट कॉंक्रिटचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे.