अमरावती : संपूर्ण देशात ‘एनसीएपी’ (नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम) अंतर्गत २०२३-२४ या वर्षात घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने दोनशेपैकी १९४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच गटात द्वितीय क्रमांक मुरादाबाद आणि तृतीय क्रमांक गुंटूर शहराला प्राप्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छ हवा सर्वेक्षणात १० लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूरला प्रथम, आग्रा शहराला द्वितीय, तर ठाणे शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये परवानू शहराला प्रथम, काला आंब शहराला द्वितीय, तर अंगूल या शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

हेही वाचा – उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे ५ बळी

स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने मानांकन जाहीर केले. या संदर्भातील पत्र पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे उप सचिव रवींद्र कुमार तिवारी यांच्याकडून अमरावती महापालिकेला मिळाले आहे. महापालिकेद्वारे ‘एनसीएपी’अंतर्गत आतापर्यंत केलेल्या उत्तम कामगिरीचाच हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी दिली. येत्या ७ सप्टेंबर रोजी पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळ येथे अमरावती महापालिकेला हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेला भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही देवीदास पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – सूनेचे डोके भिंतीवर आपटले; सासूविरोधात गुन्हा

पर्यावरण मंत्रालयाद्वारे शहरांना स्वयंमूल्यांकन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. एकूण १३१ शहरांनी अहवाल सादर केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या अहवालांची तपासणी केली. त्यांनी काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे मानांकन जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावतीने तिसरा क्रमांक पटकावला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The air in amravati is clean number one in the country mma 73 ssb
Show comments