यवतमाळ : येथील अवसायनात निघालेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील ९७ कोटींच्या वसुलीप्रकरणी बँकेच्या महिला संचालकांसह व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्ता अवसायकांनी गोठविल्या (फ्रिज) आहेत. संचालक आणि अधिकाऱ्यांच्या मालकीच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्ता विक्रीवर आक्षेप नोंदविण्यात आल्याने त्यांच्या मालमत्तांवर टाच आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा आक्षेप पाठविण्यात आला आहे. त्यामुळे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी अशा १६ व्यक्तींच्या मालमत्तांचे व्यवहार थांबणार आहेत. कुठलीही मालमत्ता विकण्यापूर्वी अथवा तारण म्हणून गहाणात ठेवण्यापूर्वी अवसायक कार्यालयाची संमती घ्यावी लागणार आहे. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत अधिनियम १९६० चे कलम ८८ (१) अन्वये चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालात संस्थेत झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्यावर निश्चित करण्यात आली. ही रक्कम ९७ कोटी इतकी आहे. ही रक्कम बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष विद्या केळकर, तत्कालीन संचालिका गीता मालीकर, शोभा बनकर, उषा दामले, प्रगती मुक्कावार, प्रणिता देशपांडे, सुशीला पाटील, अनुराधा अग्रवाल, सुजाता महाजन, राजश्री शेवलकर, शीला हिरवे, जया कोषटवार, मंजुश्री बुटले, पौर्णिमा गिरडकर, सुरेखा गावंडे, शीतल पांगारकर यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश आहेत. या सर्व व्यक्तींनी त्यांच्या नावे असलेल्या, मालकीच्या असलेल्या सर्व चल आणि अचल संपत्तीचे हस्तांतरण खरेदी-विक्रीचे व्यवहार किंवा त्यांच्या मालकीची मालमत्ता तारण अथवा व्यवहार अवसायकांच्या संमतीशिवाय करण्यात येऊ नये, याबाबतचा आक्षेप अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी नोंदविला आहे.

हेही वाचा – परदेशात शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेला ५ जुलैपर्यंत मुदतवाढ; सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

१८५ कोटी अडकल्याने ३६ हजार सभासदांचा जीव टांगणीला

बँक अवसायनात निघाल्याने ३६ हजार सभासदांचे १८५ कोटी रुपये बँकेकडे अडकले आहेत. यापूर्वी महिला बँकेच्या ४० हजार सभासदांना त्यांच्या ठेवींचे ३०० कोटी रुपये वित्त हमी महामंडळाकडून परत मिळाले आहे. त्यामुळे अवसायकाला रकमेची वसुली केल्यानंतर सर्वप्रथम वित्त हमी महामंडळाला ३०० कोटी रुपये परत द्यावे लागणार आहे. सध्या बँकेजवळ गुंतवणुकीतील व चालू वर्षाच्या वसुलीतील २२५ कोटी रुपये आहेत. मात्र, अजूनही ७५ कोटी रुपये जुळविण्याची गरज आहे. ३०० कोटी रुपये वित्त हमी महामंडळाला परत केल्यानंतर उर्वरित ३६ हजार सभासदांचे १८५ कोटी रुपये परत मिळण्याची आशा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The assets of the directors and officers of mahila sahakari bank at yavatmal have been freez nrp 78 ssb
Show comments