यवतमाळ: येथे आज सोमवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे तीव्र सावट दिसत आहे. शहर या अभियानासाठी ‘फलकमय’ झाले असताना शहरातील आर्णी मार्गावर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फलकांवर डांबर फासण्याची घटना उजेडात आली. अनेक ठिकाणी फलक फाडण्यात आले. या प्रकाराने पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शहरालगत किन्ही या गावी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२.३० वाजता होत आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून संपूर्ण शहरात व आर्णी मार्गावर बॅनर लावले आहेत. या बॅनरमुळे एकीकडे वाहतुकीस त्रास होत असताना नगर परिषद प्रशाननानेही बॅनरबाजीला विरोध केला नाही. आजच्या कार्यक्रमात मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन अतिदक्ष आहे. मात्र पोलिसांची नजर चुकवून येथील आर्णी मार्गावरील बसस्थानक चौक, ओम कॉलनीचे प्रवेशद्वार आदी ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या फलकावरील छायाचित्रावर अज्ञातांनी डांबर फासले.
ही बाब आज सकाळी उजेडात आल्यानंतर पोलिसांसह नगर परिषद प्रशासनाची एकच धावपळ झाली. नगर परिषद प्रशासनाने हे फलक तत्काळ काढून घेतले. अनेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकावर संपूर्ण डांबर फासून अज्ञातांनी राग काढला आहे. शिवाय अनेक ठिकाणी फलक फाडण्यात आले आहे. हा प्रकार कोणी केला याचा शोध अद्याप लागला नाही. मात्र मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. या प्रकारामुळे आज होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे तीव्र सावट असून अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलीसांची ड्युटी लावण्यात आली आहे.
खबरदारी म्हणून आर्णी मार्गावरील सर्व पानटपऱ्या, फेरीवाल्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळ नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने आज या महामार्गावरील जड वाहतूकीस प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे.