नागपूर : दत्ताजी डिडोळकर, बाबासाहेब आपटे यांनी आपले संपूर्ण जीवन हे संघचरणी वाहिले. असे स्वयंसेवक, प्रचारकांच्या त्यागावरच संघाचा पाया उभा आहे, प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. बाबासाहेब आपटे स्मारक समिती, संस्कार भारती, संस्कृती भारती यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या दत्ताजी डिडोळकर स्मृती भवनाचे लोकार्पण भागवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सुधीर दप्तरी उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, दत्ताजी डिडोळकर, बाबासाहेब आपटे यांच्या स्मृती अजरामर राहण्यासाठी, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी म्हणून हे सभागृह उभे झाले आहे. सुविधा झाली असली तरी एक जबाबदारी वाढली. असेच कार्य सुरू राहिले तर आजचा आनंद वेळोवेळी या देशामध्ये अनेकांना मिळत राहिल. ज्यांच्या स्मृतींचे नाव भवनाला दिले त्यांच्या कार्याचा प्रभाव हा सर्वकाळ सुरू राहील.
हेही वाचा >>> Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…
निसर्गाचा नियम आहे हे शरीर अमर राहू शकत नाही. मात्र, व्यक्तीचे कार्य अजरामर राहू शकते. त्यांच्या स्मृती चिरकाल टिकाव्या म्हणूनच अशा भवनांचे निर्माण केले जाते. चांगला समाज उभा करण्यासाठी दत्ताजी डिडोळकर, बाबासाहेब आपटे यांनी कार्य केले होते याची हा भवन आठवण करून देत राहील, असेही भागवत म्हणाले. यावेळी अशोक डिडोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. चालन आशुतोष अडोनी यांनी केले.