गडचिरोली : राज्यातील अविकसित, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीचा कायापालट करू पाहणारा भारतमाला परियोजना आणि समृद्धी महामार्गाला ओडिशाहून आलेल्या २३ रानटी हत्तींचा धोका निर्माण झाला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांनी गोंदिया गडचिरोलीतील रानटी हत्तींचा वावर असलेल्या परिसराला हत्तींसाठी संरक्षित क्षेत्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव वनविभागाच्या वन्यजीवरक्षा व संचालक विभागाकडे सादर केला आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागातून जाणारे हे दोन महामार्ग प्रकल्प अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात विपुल प्रमाणात असलेल्या लोहखनिज साठ्यामुळे त्यावर आधारित उद्योग उभारून या भागाचा विकास करण्याचा दावा सरकारकडून नेहमीच केला जातो. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. कोनसरी लोहप्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. परंतु येथील खनिज किंवा त्यातून निर्मित उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी चारही बाजूंनी महामार्गांची जोडणी नाही. त्यामुळे महसुलासह रोजगार निर्मितीवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो आहे. यावर तोडगा म्हणून भारत सरकारकडून भारतमाला परियोजनेतून तेलंगणा येथील बेलमपल्ली-गडचिरोली-दुर्ग असा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. सोबतच समृद्धी महामार्गालादेखील गडचिरोलीच्या दोन टोकाला जोडण्यात येणार आहे. हे दोन्ही महामार्ग प्रस्तावित हत्ती संरक्षित क्षेत्रात येत असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील धानोरा, देसाईगंज, गडचिरोली आणि आरमोरी या तालुक्यांतील जवळपास ४ हजार वर्ग किलोमीटर जंगल परिसर यासाठी आरक्षित करण्याची मागणी यात आहे.
हेही वाचा – पुढील २४ तासांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ, रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
विशेष म्हणजे या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली आहे. मंजूर आराखड्यानुसार ऑगस्ट २०२५ मध्ये हे दोन्ही महामार्ग बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी हत्ती संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास या महामर्गांचे काम ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असा असेल ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला परियोजनेअंतर्गत तेलंगणातील बेलमपल्ली-गडचिरोली-दुर्ग (छत्तीसगड) असा तीन राज्यांतून हा महामार्ग जाणार आहे. एकूण ५६८ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग गडचिरोलीतील ज्या भागातून जाणार आहे. त्याच परिसराला या रानटी हत्तींनी आपला अधिवास बनवला आहे. दुसरीकडे प्रस्तावित नागपूर ते गडचिरोली समृद्धी महामार्गदेखील वडसा, गोंदिया सीमाभागातून जाणार आहे. तो परिसरदेखील प्रस्तावित हत्ती संरक्षित क्षेत्रात येतो.
हेही वाचा – सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
या संदर्भात अहेरी विधानसभेचे आमदार तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री यांना विचारले असता ते म्हणाले, हे स्थलांतरित रानटी हत्ती मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी आहेत. ते ओडिशाहून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत दाखल झाले आहेत. हा परिसर या रानटी हत्तींचा कायमस्वरुपी अधिवास नाही. त्यामुळे हत्ती संरक्षित क्षेत्र घोषित करून गडचिरोली जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. याबाबत मी वरिष्ठस्तरावर चर्चा करणार आहे.