अकोला : संततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात एक १० वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात घडली होती. गेल्या तीन दिवसांपासून शोध मोहीम सुरू होती. अखेर शनिवारी दुपारी मुलाचा मृतदेह मोर्णा नदीत भोडजवळ आढळून आला. जियान इकबाल अहमद कुरेशी (१०,रा. खैर मोहम्मद प्लॉट) असे त्या मुलाचे नाव आहे.
अकोल्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. शहरातील नाले भरभरून वाहत होते. दरम्यान, खैर मोहम्मद प्लॉट येथे पावसाच्या पाण्यात जियान आणि त्याचे मित्र घराबाहेर खेळत होते. जियान याची चप्पल नाल्याच्या पाण्यात गेली. चप्पल वाहत असताना ती पकडण्यासाठी तो त्यामागे धावत गेला. पाण्याचा आणि नाल्याचा अंदाज न आल्याने जियान पाण्यात वाहून गेला.
हेही वाचा >>> अमरावती : सव्वाबारा लाखांनी ऑनलाइन फसवणूक
या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि मनपा अग्निशमन विभागाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्रीचा अंधार आणि मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे आले. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून शोध व बचाव पथकाकडून निरंतर शोध कार्य सुरू होते. अखेर शनिवारी त्या मुलाचा मृतदेह भोड येथे आढळून आला.