बुलढाणा : नाल्याच्या पुरात ४ जुलै रोजी संध्याकाळी बैलगाडीसह वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह आज ६ जुलैला दुपारी आढळून आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने यासाठी दीर्घकाळ मोहिम राबविली. समाधान श्रीराम सरकटे (४८, राहणार शिवणी जाट, तालुका लोणार) असे मृताचे नाव आहे.
लोणार तालुक्यात ४ जुलै रोजी दुपारी दमदार पावसाला सुरवात झाली. शिवणीजाट गावा जवळील नाल्याला आलेल्या पुरात शेतातून येत असलेल्या बेलगाडीसह तिघेजण वाहून गेले. यापैकी केशव धनराज बरले (वय ५२ ), संतोष हरिभाऊ सरकटे (४६ ) हे दोघे जण बचावले. समाधान श्रीराम सरकटे (४८) हे पुराच्या लोंढ्यात वाहून गेले. त्यांचा गावकऱ्यानी शोध घेण्याचा असफल प्रयत्न केला होता.
हेही वाचा >>>Video : बुलढाण्यात पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास! वाहनांचीही ये-जा; व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या जिवाचा उडतोय थरकाप…
दरम्यान, ५ तारखेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शोध व बचाव पथकाने बुधवारी दिवसभर व आज शोध घेतला असता दुपारी बेपत्ता समाधान सरकटे यांचा मृतदेह हाती लागला.