चंद्रपूर परिमंडळाची वीज बिल थकबाकी ४९३ कोटींच्या घरात पोहचली असताना वीज बिलाचा भरणा तत्काळ करावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. मुख्य अभियंत्यांच्या या आवाहनाला साद देत गडचांदूर येथील शेतकरी डी.एच.पुरी यांनी ९७ हजार ८५० रुपयांच्या थकबाकीचा एकरकमी भरणा केला. ही कार्यतत्परता पाहून मुख्य अभियंता देशपांडे यांनी स्वत: शेतात जाऊन त्यांचा सत्कार केला.
हेही वाचा- नागपूर : रेल्वेत आढळली १३९९ बेवारस मुले; कौटुंबिक समस्या, शहराच्या आकर्षणामुळे घर सोडले
चंद्रपूर परिमंडळाची वीज बिल थकबाकी पाचशे कोटींच्या जवळ पोहचली आहे. त्यामुळे वीज परिमंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बिल वसुली तथा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. एकट्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाख तर कृषिपंपाची २५० कोटी ७६ लाखाची थकबाकी आहे. ही थकबाकी तत्काळ जमा करा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. वीज बिल न भरणाऱ्यांचे विद्युत कनेक्शन तत्काळ कापले जात आहे. मात्र, काही शेतकरी, व्यापारी वीज बिलाचा भरणा करून मंडळाला सहकार्य करत आहे.
हेही वाचा- धक्कादायक..! देशभरातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक
गडचांदूर येथील शेतकरी डी.एच.पुरी यांनी मुख्य अभियंता देशपांडे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत एका दिवसात ९७ हजार ८५० रूपयांचे थकीत बिल भरले. एक गरीब शेतकरी असा सकारात्मक विचार करीत असल्याचे पाहून मुख्य अभियंता देशपांडे यांनी पुरी यांच्या शेतात स्वत: जाऊन त्यांचा सत्कार केला. कृषिपंपाचा लाभ घेतल्यानंतर अशा पद्धतीने बिल भरणारे शेतकरीच उत्कृष्ट ग्राहक असल्याची प्रतिक्रिया देत देशपांडे यांनी दिली.