अमरावती : राज्‍यात मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आहे. त्‍यामुळे विरोधकांच्‍या पोटात दुखायला लागले आहे. ही योजना बंद पाडण्‍यासाठी काही सावत्र भाऊ न्‍यायालयात गेले. आम्‍ही लोकांना लाच देतो, असे आरोप त्‍यांनी केले. ही योजना आमचे सरकार आल्‍यावर बंद करू, चौकशी करू आणि दोषींना तुरूंगात टाकू, अशी भाषा महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी केली. मी लाडक्‍या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्‍या शेतकऱ्यांसाठी एकदा नाही, शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार आहे, असा टोला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी लगावला.

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे दर्यापूरचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि भाजपचे जिल्‍ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्‍हणाले, महाविकास आघाडी ही विकास विरोधी आहे. त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवता कामा नये. निवडणुकीत काळात खोटी आश्‍वासने देतात आणि नंतर मुद्रणदोष असल्‍याचे सांगून शब्‍द फिरवतात, हे कर्नाटक, हिमाचलप्रदेशमध्‍ये दिसून आले आहे. आम्‍ही लाडकी बहीण योजना सुरू केली. त्‍याला भरघोस प्रतिसाद मिळत असल्‍याचे पाहून आता महाविकास आघाडीने महालक्ष्‍मी योजनेची घोषणा केली आहे. याआधी महिलांना कधीही पैसे मिळाले नव्‍हते. हे अर्थसाहाय्य जात, धर्म पाहून दिली जात नाही. यांना योजना सुरू करायची होतीच तर महाविकास आघाडीच्‍या अडीच वर्षांच्‍या कार्यकाळात त्‍यांचे हात बांधले होते का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होते. मात्र, आम्‍ही हे भ्रष्‍टाचारी सरकार उलथवून टाकले. महायुतीचं सरकार सत्‍तेवर आले आणि स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरु केल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा… “महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

एकनाथ शिंदे म्‍हणाले, महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सीनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत.

Story img Loader