नागपूर : अनेक अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीतील ‘भाई’ आणि ‘दादा’चे आकर्षण असते. मुले शिक्षण व भविष्याचा विचार न करता गुन्हेगारीकडे आकर्षित होतात.अशाच प्रकारे झटपट पैसे कमविण्यासाठी गुन्हेगारीत उतरलेले दोन अल्पवयीन मुलांनी घरफोडी, दरोडा अशा गुन्ह्यात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले. बंदिस्त असलेली मुले भींतीवरुन उड्या मारुन किंवा खिडकी फोडून पळून गेल्याचे काही प्रकार त्यांना माहिती होते.

त्यामुळे बालसुधारगृहातील सुरक्षारक्षकाला त्यांनी जाळ्यात ओढले आणि त्याच्याच मदतीने ते पळून गेले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला. पोलिसांनी सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. मोहित मुळे (२०, रा. पिवळी नदी) असे आरोपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहनांची तोडफोड यांसारख्या गंभीर गुन्ह्यात किशोरवयीनांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब ठरत आहे. अल्पवयीन असल्याने ही मुले बालसुधारगृहातून महिना-दोन महिन्यांत बाहेर येतात आणि गुन्हेगारी क्षेत्रात सहजपणे दाखल होतात. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब घातक ठरत आहे. या वाढत्या बालगुन्हेगारीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न पोलिसांपुढे दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा >>>ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…

मौदा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात आणि रामटेक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन अल्पवयीन मुले नागपुरातील बालसुधारगृहात दाखल होती. दोन्ही मुले गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात सक्रीय आहेत. त्यांना बालसुधारगृहातून पलायन करायचे होते. त्यामुळे त्यांनी बालसुधारगृहाचा सुरक्षारक्षक मोहित मुळे याच्याशी मैत्री केली. त्याला नेहमी नाश्ता आणि चहापाण्यासाठी मित्रांकडून पैसे देत होते. त्यांनी बुधवारी सुधारगृहातून पळून जाण्याचा बेत आखला.

त्यानुसार दोन्ही मुलांनी सुरक्षारक्षक मोहितला हाताशी धरले. येथून पळून गेल्यानंतर पैसे देण्याचे आमिष दाखवले. पैशाला मोहितही भाळला. त्याने दोन्ही मुलांना सकाळी साडेनऊ वाजता पळून जाण्यासाठी मदत केली. सुधारगृहाचे दार उघडले आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली.

पोलिसांची तारांबळ, शोधाशोध

दोन्ही मुले बालसुधारगृहातून पळून गेल्याची माहिती साडेदहा वाजता अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. कर्मचाऱ्यांनी लगेच कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. दोन्ही मुले गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील असल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मौदा आणि रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे दोन पथके पळून गेलेल्या मुलांच्या शोधासाठी तैनात करण्यात आली. अद्याप पळून गेलेल्या मुलांचा शोध लागला नसल्याची प्रतिक्रिया कपिलनगरचे ठाणेदार महेश आंधळे यांनी दिली.

हेही वाचा >>>‘‘काँग्रेसच्या षडयंत्रामुळे उमेदवारीपासून वंचित,” माजी आमदाराचा आरोप

पालकांच्या दुर्लक्षामुळे मुले गु्न्हेगारीत सक्रिय

शहरात राज्याबरोबरच परराज्यांतूनही रोजी-रोटीसाठी दाखल झालेला सर्वसामान्य कामगार वर्ग येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. झोपडपट्टीसारख्या ठिकाणी मोलमजुरीसाठी सकाळीच आई-वडील घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. काही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. तर, काही शिक्षण अर्धवट सोडतात. मुले लहान वयातच वाममार्गाला लागणे, हा याचा परिणाम. उच्चभ्रू सोसायट्यांमध्येही आई-वडील दोघेही नोकरी करतात. मात्र, त्यांची मुले एक तर पाळणाघरात असतात किंवा त्यांच्यासाठी खास काळजी घेणारा (केअर टेकर) नियुक्त केलेला असतो. मात्र, अती लाडामुळे या मुलांमध्ये त्वरित राग येणे आणि हिंसक वृत्ती वाढीस लागल्याचे निरीक्षण आहे. याच्या परिणामीही त्यांच्या हातून गुन्हे घडत असल्याचे दिसते.