नागपूर : मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयातर्फे १ मार्च ते २४ मार्च २०२५ दरम्यानच्या काळात तब्बल ७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडळात नागपूरसह वर्धा जिल्ह्याचा समावेश होतो. येथील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे १८ लाख ८५ हजारावर वीज ग्राहक आहेत. वारंवार सूचना देऊनही वीज देयक थकवणाऱ्या ७ हजार ५६ ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित केला गेला. १ ते २४ मार्च या काळात ही कारवाई केली गेली. त्यात नागपूर शहर मंडळातील ४ हजार ९६९ ग्राहक, नागपूर ग्रामिण मंडळातील १ हजार ५६ ग्राहक, तर वर्धा जिल्ह्यातील १ हजार ३१ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने थकबाकीमुळे खंडित केला.
थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांपैकी नागपूर शहर मंडळातील ३ हजार ७४३ ग्राहक, नागपूर ग्रामीण मंडळातील ५३९ तर वर्धा मंडळातील ५५८ ग्राहक अशा एकूण ४ हजार ८४० ग्राहकांनी थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करीत वीजपुरवठा पुर्ववत करुन घेतला. दरम्यान वीज पुरवठा आताही खंडित असलेल्यांकडे अवैधरित्या वीज जोडणी घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कारवाई केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्यासह इतरही अधिकारी स्वत: हजर राहत आहेत. शहरातील संवेदनशिल भागात पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई केली जात आहे.
मोहीम सुरूच राहणार
थकबाकीदारांविरोधात ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक, लेखा व मानव संसाधन विभागातील महिला व पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध पथके स्थापन केली आहेत. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणकडे थकबाकीच्या संपूर्ण रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा जोडला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केल्यावर थकबाकी न भरता परस्पर वीजपुरवठा जोडणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहे.