नागपूर: परवडत नसल्याने मध्य भारतातील बऱ्याच कोळसा खाणी २० वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) देशाची कोळशाची गरज बघून या बंद खाणी महसूल वाटप तत्त्वावर देणे सुरू केले आहे. आधी वलनी खाण व आता एबी इनलाईन भूमिगत खाणीबाबतचा करार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेकोलिने या करारानुसार वलनी खाणीचे काम आधी वेन्सार कन्स्ट्रक्शन लिमि. या कंपनीला दिले होते. त्यातून उत्पादनही सुरू झाले. सोमवारी एबी इनलाईन भूमिगत खाणीची जबाबदारी श्री अमरनाथ मिनरल प्रा. लि.ला दिली गेली. वलनी खाणीतून येत्या २० ते २५ वर्षांत ६.०५ मिलियन टन कोळसा तर एबी इनलाईन खाणीतून ६.५५ मिलियन टन कोळशाचे उत्पादन केले जाणार आहे.

हेही वाचा… विक्रीसाठी आणलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका, दोन आरोपींना अटक

वेकोलिने सोमवारी श्री अमरनाथ मिनरल प्रा. लिमि. कंपनीला लेटर ऑफ अवाॅर्ड दिले. याप्रसंगी वेकोलिचे अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, श्री अमरनाथ मिनरल प्रा. लिमि.चे शैलेंद्र कैलाशचंद्र अग्रवाल, नरेंद्र सिंग, भूपिंदर सिंग कोहली तर वेकोलिकडून तांत्रिक (नियोजन/प्रकल्प) संचालक ए. के. सिंग, तरुण कुमार श्रीवास्तव, ए.पी. सिंग, संजय भट उपस्थित होते. या बंद झालेल्या व परवडत नसलेल्या खाणींचा वेकोलिकडून कोणताही वापर होत नव्हता. परंतु या नवीन पद्धतीने एकीकडे वेकोलिला उत्पन्न मिळेल दुसरीकडे स्थानिकांना खाणीत रोजगारही मिळेल, असे वेकोलिच्या जनसंपर्क विभागाचे व्यवस्थापक मिलिंद चहांदे यांनी सांगितले.

नवीन करारात काय?

वेकोलिच्या महसूल वाटप तत्त्व करारानुसार, या खाणीबाबत सगळ्या परवानग्या कंत्राट दिलेल्या कंपनीला घ्याव्या लागतील. खाणीतून कोळसा काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीही कंपनीची असेल. मनुष्यबळाच्या सुरक्षेसह इतर निरीक्षण यंत्रणा वेकोलिची असेल. काढलेला सर्व कोळसा वेकोलिला द्यावा लागेल. वेकोलि या कोळशाची त्यांच्या करारानुसार विक्री करेल. एकूण महसुलातील १५.३१ टक्के वाटा वेकोलिला मिळेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The coal mine that was closed 20 years ago will be restarted new contract of western coalfields ltd mnb 82 dvr