नागपूर: मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालीटी रुग्णालयात ५ जुलैच्या रात्री चक्क कोब्रा विषारी साप निघाल्याची माहिती आहे. प्रशासनाने वेळीच सर्पमित्राला बोलावल्यावर या सापला पकडण्यात आले.
सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मेडिकल व सुपर स्पेशालिटीचा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे आहेत. या परिसरात नेहमीच साप दिसून येतात. ५ जुलैच्या संध्याकाळी ‘सुपर’च्या तळमजल्यावर असलेल्या रक्तपेढी विभागातून कोब्रा जातीचा विषारी साप बाहेर निघाला. तो वॉर्डाकडे जात असल्याचे एका कर्मचाऱ्याला दिसताच त्याने आरडाओरड करत इतरांना माहिती दिली. तातडीने एकाने परिचयातील सर्पमित्राला माहिती दिली.
या सर्पमित्राने शिताफीने कोब्राला पकडल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. या सापाला कालांतराने लोकवस्तीच्या बाहेर सोडण्यात आल्याचे मेडिकलच्या अधिकाऱ्याला सर्पमित्राकडून सांगण्यात आले.