वाशीम : लोककलावंत आपल्या कलेतून संस्कृती जपण्याचे काम करतात. मनोरंजन, प्रबोधन करतात. वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून वृद्ध कलावंत समिती गठीत करण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास सातशे मानधन प्रस्ताव समाज कल्याण विभागात धूळखात पडून आहेत.
नुकतेच लोकप्रिय तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर बसस्थानकावर भिक्षा मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महिला आयोगाने त्याची दखल घेतली. मात्र, जिल्ह्यातील वृद्ध कलावंत समिती मागील तीन वर्षांपासून गठीतच झाली नसून समाज कल्याण विभागाकडे जवळपास सातशे कलावंताचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत.
हेही वाचा – सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण… पाहा आजचे भाव
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात समिती निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु नंतर सरकार बदलले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय राठोड यांची निवड करण्यात आली. मात्र, त्यांनी कायमच जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वृद्ध कलावंत समिती गठीतच झाली नाही. मोठ्या आशेने दाखल करण्यात आलेले प्रस्ताव रखडले आहेत. याकडे पालकमंत्री लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.