नागपूर : एका कंपनीच्या विक्री प्रतिनिधीने दौऱ्यावर न जाता विमान प्रवास आणि निवासाचे बोगस बिल सादर करून कंपनीची १६ लाख ८९ हजार रुपयाने फसवणूक केली.या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी वैभव मुळे (३५) रा. नरेंद्रनगर याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
रामदासपेठ येथील रहिवासी फिर्यादी शिरीष गुप्ता (३६)यांची एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत एरोकॉम कुशन प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारच्या गाद्या तयार केल्या जातात. त्याची देशभरात विक्री केली जाते. फिर्यादी गुप्ता यांनी आरोपी वैभवची विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. त्याच्याकडे देशभरात फिरून विविध कंपन्यांशी संपर्क वाढवून त्यांच्याकडून ऑर्डर घेण्याचे काम देण्यात आले होते.
हेही वाचा >>>शिंदे- फडणवीस- पवार सरकारची चिंता वाढणार! सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संघटना आंदोलन करणार..
यासाठी त्यांना नेहमीच दिल्ली, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी महानगरात जावे लागायचे. वैभवने याकामासाठी कंपनीकडून १८ जून २०२२ ते २७ मे २०२३ दरम्यान या अकरा महिण्याच्या कालावधीत अॅडव्हॉन्सच्या नावावर वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या तारखेला १६ लाख ८९ हजार रुपये घेतले. मात्र, बहुतांश वेळा तो दौऱ्याच्या ठिकाणी गेलाच नाही. त्याने विमान प्रवास, निवासाचे बनावट बिले सादर करून कंपनीची फसवणूक केली.
फिर्यादीच्या कंपनीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता सत्य उजेडात आले. यासंदर्भात गुप्ता यांनी त्यांना जाब विचारला. चौकशी केली. मात्र, वैभवने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने काम सोडले. गुप्ता यांनी पैशाची मागणी केली असता चालढकल केली. अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.