नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जाचे खाते आहे तर आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरूच आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्सवर माहिती दिली असून अनेक आरोप केले आहेत. विधिमंडळात आपण खोटे बोलला होतात, आता हे मान्य करा उपमुख्यमंत्री साहेब आणि राजीनामा द्या. तुम्हाला पेपर नीट घेता येत नाहीत मग महाराष्ट्राचे कसे होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – बुलढाणा : भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकालही जाहीर झाला. आयबीपीएसनी ही परीक्षा घेतली होती. समितीने सांगितले की, याबाबत १३ ऑगस्टला पेपर फुटल्याचे सांगितले होते. काही मुलांची नावेसुद्धा दिली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र काहीच चौकशी केली नाही. आज आम्हाला पुरावा सापडला आहे. आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा आणि लवकरात लवकर पेपरफुटीवर कायदा निर्माण करा. नाहीतर फडणवीस साहेब राजीनामा द्या, अशी मागणी केली आहे.