नागपूर : उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे टँकर लॉबीचा जसा फायदा होतो, तसेच पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे कंत्राटदारांचा लाभ होतो. ही बाब काही भागांतील डांबरी रस्त्यांच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी महापालिका कोट्यवधींचा खर्च करीत असली तरी पुन्हा रस्त्यावर खड्डे दिसून येत असल्यामुळे नागपूरकरांना ऐन पावसाळ्यात खड्ड्यांपासून दिलासा मिळणे कठीण झाले आहे.
शहरातील अनेक भागांत सिमेंटीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांची परिस्थिती मात्र फारच खराब झाली आहे. नंदनवन कॉलनीतील वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर पुन्हा जागोजागी खड्डे पडलेले आहेत. शिवाय या भागातील अंतर्गत डांबरी रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेत खड्डे बुजवणे सुरू केले आहे. मध्य नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये आणि गल्लीबोळात सिमेंटीकरण करण्यात आले असले तरी डांबरी रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गरुड खांब रोड, भोसला वेद शाळेचा मागील भाग, जुनी मंगळवारी या परिसरातील डांबरी रस्ता फार खराब झाला आहे. गेल्या दोन वर्षांत तीनवेळा या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, आज पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात ‘जेट पॅचर’ने या भागातील काही खड्डे बुजवण्यात आले होते आणि त्यात डांबर टाकून मलबा टाकण्यात आला होता मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिवाय ‘ओसीडब्ल्यू’चे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. वर्धमाननगर, वाठोडा, सुभेदार लेआऊट, ईश्वरनगर, गणेशनगर, भांडेवाडी या परिसरातील रस्त्यावरील गिट्टी बाहेर आली आहे.
शिवाजी पुतळा ते महाल परिसराकडे येणारा मार्ग खराब झाला आहे. पश्चिम आणि दक्षिण, पश्चिम भागातील अनेक डांबरी रस्त्यांची परिस्थिती अशीच आहे. गंगाबाई घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत असून त्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. पावसाळ्यात रस्त्यावर अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो.
हेही वाचा – भंडारा : रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
एका पावसाने खड्डे पडतील अशीच वरवरची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली जात असल्याचे दिसून येते. त्याविरुद्ध ओरड झाली की पुन्हा निविदा काढली जाते आणि खड्डे बुजवण्याचे काम दिले जाते. हे काम मिळावे यासाठीच खड्डे पाडण्याची तरतूद केली जाते. खड्डे पडावे असे डांबरीकरण करणे, ते पडल्यावर ते बुजवण्यासाठी खर्च करणे व याला मान्यता देणे अशी साखळीच महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा असेल याची कल्पना येते. दर्जा, गुणवत्ता तपासणारी यंत्रणा ही प्रशासनातील काही अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अधीन असल्याने डांबरीकरणाचे, खड्डे बुजवण्याचे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे चार-सहा महिन्यांत डांबरीकरणाचे बारा वाजतात आणि रस्त्यांवर खड्डे होतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात जातात आणि त्यांना खड्ड्यातून वाट काढण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे चित्र शहरातील अनेक भागांत दिसून येत आहे.