नागपूर: शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नागनदी व पिवळी नदीवरील ४० पेक्षा अधिक पूल असून त्यातील बहुतांश जीर्ण धोकादायक अवस्थेत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
नागनदीचे पुनरुज्जीवन प्रकल्प राबवताना या सर्व पुलाचे बांधकाम नव्याने केले जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी सध्या मात्र या पुलाची स्थिती बघता ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. नागनदीवरील शंकरनगर पेट्रोलपंपाजवळील पुलाची उंची कमी आहे. शिवाय या पुलावरून जाताना कठडे नाही.
हेही वाचा… सूनेचे डोके भिंतीवर आपटले; सासूविरोधात गुन्हा
बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला पूल आहे. या पुलाची रुंदी, उंची कमी आहे. शिवाय या ठिकाणी नागनदीला लागून असलेली सुरक्षा भिंत अनेकदा पडली आहे. शुक्रवारीतून राहतेकर वाडीकडे जाणाऱ्या नादीनदीवरील पूल जीर्ण व धोकादायक स्थितीत आहे. या पुलाचा एक भाग काही खचलेला असला तरी त्यावरून अजूनही लोक जाणे-येणे करतात.
हिवरीनगर येथील पुलाचे नव्याने काम करावे लागणार आहे. पारडी दहनघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नागनदीवर असलेला पूल गेले काही दिवस बंद होता. मात्र, तो पुन्हा सुरू करण्यात आला असून त्यावरील वाहतूक सुरू आहे. सतरंजीपुरा, जागनाथ बुधवारी, मंगळवारी भागात, असे अनेक छोटे पूल असून ते सुद्धा जीर्ण झाले आहेत.
हेही वाचा… अमरावतीतील हवा शुद्ध, देशात प्रथम क्रमांक
धरमपेठतून गिरीपेठकडे जाणाऱ्या नागनदीवर असलेला आणि शंकरनगर येथील वोक्हार्ट रुग्णालाच्यामागे असलेला पूल जीर्ण झाला आहे. मात्र, हा पूल अजूनही वाहतुकीसाठी बंद नसून लोकांची ये-जा त्यावरून सुरू आहे. भरतवाडा मुख्य रस्त्यापासून दुर्गानगर गल्लीपासून पुढे गेल्यानंतर नागनदीचा पूल ओलांडला असता, भवानी माता मंदिर, पुनापूर आणि पारडी चौकाकडे जाणारा परिसर आहे. या सर्व परिसराला जोडणारा नागनदीवरील पूल कमकुवत झाला होता. या पुलासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले, मात्र प्रशासनाने लक्ष अजूनही लक्ष दिले नाही.
हेही वाचा… Teachers Day 2023 : वंचितांना रस्त्यावरच अक्षरांची ओळख पटवून देणारा ‘फूटपाथी’ शिक्षक
नागनदीपासून पिवळी नदीपर्यंत शहराच्या हद्दीत असलेले २३५ नाले येऊन मिळतात. नाल्यांद्वारे शहरातील सांडपाणी नदीपात्रात येत असल्याने नदीची १७ किमीमीटर लांबी जवळजवळ मृतप्राय झाली आहे.
नागनदीवरील जीर्ण झालेल्या पुलाचे महापालिकेचे अंकेक्षण करावे. नदीचे पुनरुज्जीवन होईल तेव्हा होईल, पण आज जर पूल कोसळल्याने जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? दुर्घटना होण्यापूर्वी पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. किंवा संबंधित पूल वाहतुकीसाठी तरी बंद केले पाहिजे.