नागपूर : जिल्हा परीषदेचा सदस्य असलेल्या कॉंग्रेस नेत्याचे तब्बल २०. ६२ कोटी रुपये सोंटू जैनच्या ऑनलाईन डायमंड एक्स्चेंज गेमींग अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्यात आली. ती रक्कम स्वतः त्या नेत्याने विक्रांत अग्रवालला दिली होती. त्यामुळे विक्रांत अग्रवाल हा सोंटूसाठी दलालीचे काम करीत होता का? अशी चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या कोट्यवधीच्या अवैध साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या विक्रांत अग्रवाल याने ७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कोट्यवधी रुपये हारल्यानंतरच सोंटू जैनविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आल्याने तक्रारीवर संशय निर्माण झाला आहे. नगरधनचे कॉंग्रेस नेते दुधराम सव्वालाखे यांनी विक्रांत अग्रवालला २० कोटी ६२ लाख २५ हजार रुपये दिले होते, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोंटूचे वकील अ‍ॅड. चव्हाण यांनी दिली होती. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, कॉंग्रेस नेते दुधराम सव्वालाखे यांनी २० कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट सोंटू जैनकडे गुंतवली नव्हती. ती रक्कम विक्रांत अग्रवाल यांच्याकडे दिली होती. ती रक्कम विक्रांतने सोंटूच्या खात्यात जमा केली होती. अशी माहिती बँकेच्या विवरणपत्रातून पोलिसांच्या हाती लागली. विक्रांत अग्रवालने सोंटूकडे स्वतःहून रक्कम वळती केली आहे. त्यामुळे गेमींग अ‍ॅपच्या माध्यमातून दलाली मिळविण्यासाठी विक्रांत अग्रवाल याने कॉंग्रेस नेता सव्वालाखे यांची रक्कम सोंटू जैनला दिली असल्याची चर्चा आहे. त्यावरून मुख्य आरोपी सोंटू जैनसाठी विक्रांत दलाली करीत असल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. प्रत्येक बाबींची वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पडताळणी करूनच तपास सुरु आहे, अशी प्रतिक्रिया तपास अधिकारी शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा – भाजपा आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तातडीचे बोलावणे; विषय गुलदस्त्यात

अशी झाली गुंतवणूक

विक्रांत अग्रवाल आणि सोंटू जैनच्या आर्थिक व्यवहारात ३१.८७ कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. त्यामध्ये विक्रांतचे स्वतःचे ९.५४ कोटी, पूजा अग्रवालचे १.७० कोटी तर कॉंग्रेस नेते दुधराम सव्वालाखे यांचे २०.६२ कोटी रुपयांचा समावेश आहे. विक्रांत अग्रवाल याने सोंटू जैनच्या खात्यात वेळोवेळी कोट्यावधी रुपये टाकले आहेत. त्यामुळे विक्रांतची खरच फसवणूक झाली किंवा सोंटूला फसविण्यासाठी कट रचण्यात आला, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

सोंटू जैनकडे गुंतवलेले पैसै हे पत्नी, मित्र आणि नातेवाईकांकडून घेतले होते. माझे मित्र दुधराम सव्वालाखे यांच्याकडूनही काही पैसे घेतले होते. त्या पैशाबाबतचे विवरण पोलिसांना दिले असून सोंटू जैनने माझी फसवणूक केली. – विक्रांत अग्रवाल (तक्रारदार)

हेही वाचा – यवतमाळ : धक्कादायक! शासकीय वाहनाने शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग

विक्रांत अग्रवाल माझे मित्र आहेत. मी जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायाशी जुळलेलो आहे. मी २० कोटी ६२ लाखांची रक्कम माझा मित्र विक्रांतला दिली होती. आमचे एकमेकांशी आर्थिक व्यवहार २० वर्षे जुने आहेत. मात्र, सोंटू जैनशी माझा काडीमात्रही संबंध नाही. – दुधराम सव्वालाखे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The congress leader invested 20 crores not with sontu but with vikrant did vikrant aggarwal work as a broker for sontu adk 83 ssb
Show comments