नागपूर : आरोपींकडून जप्त केलेल्या कार, दुचाकी, टीव्ही, एसी आणि अन्य वस्तू पोलीस ठाण्यातील मालखान्यात जमा केल्या जातात. मात्र, आरोपींच्या मालकीच्या जप्त वस्तूंचा आणि वाहनांचा थेट पोलीस कर्मचारी वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस हवालदाराला आरोपीची महागडी कार आवडल्याने त्याने कार घरी नेल्याची घटना उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात प्रशांत मोहोड नावाच्या एका व्यक्तीवर आर्थिक स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १३ जानेवारीला हुडकेश्वर पोलिसांनी मोहोड यांची महागडी कार (एमएच ३१-एफआर ८०२२) जप्त केली. ती कार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली. हुडकेश्वरचे मुद्देमाल मोहरीर हवालदार अजय गिरी यांना ती कार खूपच आवडली. त्यांना कार चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मालखान्यातून कारची किल्ली काढली आणि थेट घरी घेऊन गेले. काही दिवसांतच अजय गिरी यांचा कारमध्ये जीव अडकला. अजय कार घेऊन नातेवाईकांकडे जायला लागले. तसेच बाहेरगावी कुटुंबासह फिरायलाही आरोपीची कार घेऊन जात होते.

हेही वाचा – नागपूर-वर्धा तिसरा रेल्वे मार्ग : खापरी पूल तोडण्याचे काम सुरू

अशी आली घटना उघडकीस

प्रशांत मोहोड हे कारागृहातून जामिनावर बाहेर आले. त्यांनी पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या कारचा सुपूर्दनामा सादर केला. मात्र, त्यांना कार ठाण्यात दिसली नाही. कार थेट अजय गिरी याच्या बिडीपेठमधील हवालदाराच्या घरी उभी दिसली. दुसऱ्या दिवशी हवालदार कार घेऊन कुटुंबासह फिरायला जाताना दिसला. त्यानंतर मोहोड यांनी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याकडे तक्रार केली.

कर्मचाऱ्यावर कारवाई, निरीक्षक मोकाट?

पोलीस हवालदार अजय गिरी हे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात काम करतात. मात्र, आरोपीची कार वापरल्यामुळे पोलीस उपायुक्तांनी केवळ हवालदार गिरी यांना निलंबित केले. मात्र, पोलीस निरीक्षकाची साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. पोलीस ठाण्यातील प्रत्येक घडामोडीला निरीक्षक जबाबदार असतात. मात्र, या प्रकरणात निरीक्षक मोकाट तर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा – भाजपा नेत्या सना खान हत्याकांड : अमित साहूच्या नार्को चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

आरोपीची कार वापरल्याप्रकरणी हुडकेश्वरचे पोलीस हवालदार अजय गिरी यांना निलंबित करण्यात आले. गिरी यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. चौकशीत गिरीसह अन्य कुणी अधिकारीसुद्धा दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. – विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The constable of hudakeshwar used accused car the seized material is used by the police adk 83 ssb
Show comments