अमरावती : मध्‍यप्रदेश सीमेजवळील खकनार नजीक देशी बनावटीच्‍या २० पिस्‍तुलांसह तीनजणांना बऱ्हाणपूर पोलिसांनी अटक केल्‍याने शस्‍त्राच्‍या तस्‍करीसाठी कुप्रसिद्ध असलेले सातपुडा पर्वतरांगातील पाचोरी हे गाव पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. या गावात अवैध शस्‍त्रांची निर्मिती होते. सिकलीगर नावाने ओळखले जाणारे लोक या शस्‍त्रांची विक्री करताना यापूर्वीही अनेकवेळा पोलिसांच्‍या तावडीत सापडले आहेत, पण आता त्‍यांनी दलालांना सक्रिय करून शस्‍त्रांची विक्री सुरू केल्‍याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्‍यप्रदेश पोलिसांना अवैध शस्‍त्रांच्‍या तस्‍करीची गोपनीय माहिती मिळाल्‍यानंतर पांगरी फाट्यानजीक पोलिसांनी नाकेबंदी केली. यावेळी पोलिसांनी मोटरसायकलवरून जात असलेल्‍या दोघांना अडवून चौकशी केली. झडती घेतल्‍यावर दोघांकडे आठ पिस्‍तूल आढळले. त्‍यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी एका दलालाकडून आपण ही शस्‍त्रे खरेदी केल्‍याचे पोलिसांनी सांगितले. त्‍याआधारे नांदुरा कला येथे राहणाऱ्या दलालाच्‍या घरावर पोलिसांना छापा टाकला. त्‍याच्‍याकडून १२ अवैध पिस्‍तूल जप्‍त करण्‍यात आले. जप्‍त करण्‍यात आलेल्‍या पिस्‍तुलांची किंमत २ लाख रुपये आहे. दलालाने पिस्‍तुलांची खरेदी पाचोरी येथून केल्‍याचे सांगितले.

हेही वाचा – वाशिम : राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांचा ‘प्रहार’मध्ये प्रवेश

पोलिसांनी श्‍याम थानसिंग (२२), सुनील मांगिलाल (२६, दोघेही रा. मालगाव, खंडवा) तसेच दलाल रवींद्र डावर (२६, रा. नांदुरी कला) यांना अटक केली आहे. शस्‍त्रांची विक्री करणारा हरविंदर सिकलीगरचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत सिकलीगरांनी तयार केलेल्‍या अवैध शस्त्रांची मागणी वाढली आहे. दलाल त्‍यासाठी कारणीभूत मानले जात आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा; ‘या’ ४४ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, वाचा…

सिकलीगरांकडून कमी किमतीत दलाल शस्त्रे खरेदी करतात, नंतर ती देशभरात वितरित केली जातात. दलालांची लांब साखळी तयार झाली आहे. ते सिकलीगरांकडून ५ ते ६ हजारांत शस्त्र खरेदी करतात. स्थानिक दलाल १० हजारांत विकतात. यामुळे त्यांना एका पिस्तुलावर चार हजार रुपयांचा फायदा होतो. पण मोठ्या शहरांमध्ये शस्त्रांना २० हजार ते ५० हजार किंमत मिळते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The country made pistols were smuggled through pachori of madhya pradesh border 20 pistols seized mma 73 ssb
Show comments