यवतमाळ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील ७५ टक्के जनता हलाखीचे जीवन जगत आहे. यासाठी आजी-माजी राज्य व केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू असल्याची टीका अर्थतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी केली.
हेही वाचा >>> चंद्रपूर : वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाचा दबाव?
येथील सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्याोलयात आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनजळवळीचे प्रतिनिधी म्हणून प्रा. देसरडा कन्याकुमारीपासून तामिळनाडू, केरळ येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान आठ विद्यापीठ व संशोधन संस्थेत त्यांची व्याख्याने झालीत. आर्थिक विषमता, सामाजिक विसंवाद, पर्यावरणीय विध्वंस या आजच्या प्रमुख तीन समस्या आहेत. हवामान अरिष्ट व महामारीने धोक्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. सौर ऊर्जा, जैव ऊर्जा ही स्वस्त, शीघ्र व सुरक्षित पर्याय आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे महारस्ते, इथेनॉल व अन्य प्रकल्प हे पूर्णत: अनाठायी असून विनाशाकडे नेणारे आहेत, असा आरोप यावेळी प्रा. देसरडा यांनी केला.
हेही वाचा >>> नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली
यवतमाळसह विदर्भात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, उद्योग उभारणीसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. सत्ताधाऱ्यांना टक्केवारी कुठून मिळेल यातच रस आहे, असेही ते म्हणाले. गांधी-फुले-आंबेडकरांना अभिप्रेत असा विकास झाला नाही. भारताचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी प्रस्थापिंतांविरोधात जनतेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के आदी उपस्थित होते.