वन्यजीवांचे आजारपण, तंदुरुस्ती, नैसर्गिक अधिवास लाभणार
वन्यजीवांच्या आरोग्याची काळजीच नव्हे, तर त्यांच्या तंदुरुस्तीनंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणारे देशातील पहिले ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ तयार करण्याचा मान उपराजधानीने पटकावला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज हे केंद्र कुणाचेही डोळे दिपवतील, अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याने काही खासगी पशुवैद्यकांनी सेवा देण्याच्या नावाखाली हे केंद्र बळकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयानेच वनखात्याकडून तज्ज्ञांची नियुक्ती होईपर्यंत त्यांचीच चमू सेवा देईल, असे आदेश काढल्याने खासगी पशुवैद्यकांच्या इराद्यावर पाणी फेरले गेले आहे.
देशात वन्यजीवांवरील उपचाराकरिता बचाव केंद्र अनेक आहेत, पण त्यानंतर वन्यजीवांना त्यांच्या मुळ अधिवासात सोडण्याची व्यवस्था या केंद्रांमध्ये नाही. त्या पद्धतीचे केंद्रच तयार झालेले नाही. त्यामुळे उपचारानंतर वन्यप्राणी पिंजऱ्यातच पडून राहण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तसा पायंडा पडू नये म्हणून मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ची संकल्पना वनखात्यासमोर मांडली. वन्यप्राण्यांवर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यापर्यंतचा सुखकारक प्रवास या केंद्रातून जात असल्याने वनखात्यानेही त्याला मान्यता देण्यासोबतच त्यासाठी लागणारा निधी तातडीने मंजूर केला. अवघ्या तीन वर्षांत अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे केंद्र तयार झाले आणि अनेकांची नजर या केंद्रावर पडली. कल्पनाशक्तीपलीकडील या केंद्रात उपचाराच्या पिंजऱ्याला लागूनच उपचारानंतर फिरण्यासाठी दुसरा िपजरा, अशा आधुनिक पद्धतीचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर उपचारानंतर मूळ अधिवासात सोडण्यापूर्वी मोकळा पिंजरा, अशी सर्व रचना या केंद्रात आहे.
शस्त्रक्रियागृहातसुद्धा शीतकपाटापासून तर वन्यप्राणी मृत पावल्यास त्याला ठेवण्याची व्यवस्था, शस्त्रक्रिया नीट पार पडावी म्हणून त्या पद्धतीचे विजेचे दिवे, शस्त्रक्रिया टेबल, वन्यप्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी आधुनिक पद्धतीचे तापमापक, अशी अत्याधुनिक साधने आहेत. ही सर्व सुविधा आणि रचना कुणाही पशुवैद्यकाला मोहात पाडेल अशीच असल्याने काही स्वयंसेवी पशुवैद्यकांनी त्यांच्या नियुक्तीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे वशिला लावला. केंद्राची रचना होत असतानाच तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वन्यजीवांवरील उपचारासाठी गठीत केलेली चमू या केंद्रासाठीही निवडली होती. तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीण यांनी शासकीय पशुवैद्यक महाविद्यालयाला पत्र लिहून त्यांच्याकडून या केंद्राला मिळणाऱ्या सेवेची आठवण करून दिली.
स्वयंसेवी पशुवैद्यकांच्या घुसखोरीचे संकेत मिळताच नुकतेच, शनिवारी शासकीय पशुवैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दक्षिणकर यांनी या केंद्रातील वन्यप्राण्यांच्या सेवेकरिता त्यांच्या महाविद्यालयातील तीन डॉक्टरांचा चमू नियुक्त केला आणि तसे आदेशही काढले.
या चमूत स्वत: डॉ. दक्षिणकरांसह डॉ. भोजने, डॉ. उपाध्ये यांचा समावेश आहे.
शासकीय पशुवैद्यक महाविद्यालयाने वनखात्याच्या नियुक्ती होईपर्यंत केंद्राची जबाबदारी घेतली आहे. वन्यजीव कायद्याअंतर्गत अनुसुची एक ते चार मध्ये येणाऱ्या वन्यप्राण्यांवरील उपचार शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीच केलेले योग्य असतात. त्यामुळे तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी गठीत केलेली चमू या केंद्रासाठी सेवा देणार असल्याने आणि तसे आदेश त्यांनी काढल्याने ते योग्य पाऊल आहे.
– कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक, नागपूर</p>