गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ थाटात; राज्यपालांसह राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती

लोकसत्ता वार्ताहर

गडचिरोली: विविध कारणांनी मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा उच्च शिक्षणात वाढलेला टक्का आशादायी आहे. सोबतच विद्यार्थिनींची कामगिरीदेखील कौतुकास्पद असून महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. दीक्षांत समारंभात सुमारे ४५ पदवीधर आणि ६१ टक्क्यांपेक्षा जास्त सुवर्णपदक विजेत्या या विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थिनींची कामगिरी ही कौतुकास्पद असून महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. इतर विद्यार्थिनींना यापासून प्रेरणा मिळेल. गोंडवाना विद्यापीठ हे या क्षेत्रातील वनसंपदा, खनिज संसाधन, आदिवासींची कला आणि संस्कृतीच्या योग्य विकास आणि संरक्षणासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा… मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा

मागास समुहाच्या उत्थानात शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण आहे. हा समूह पुढे जाऊ इच्छितो. मात्र, त्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे आणि गोंडवाना विद्यापीठाने त्यादृष्टीने उचित पावले उचलली आहेत, असे सांगून मुर्मू यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. केंद्र सरकारने आकांक्षित जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हृयाचा समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात हा जिल्हा प्रगत जिल्ह्यांच्या पहिल्या रांगेत येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा… वर्धा: बोर पर्यटनास मिळणार चालना, जुना व नवा बोर प्रकल्पाचे एकत्रीकरण

देशात युवकांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी आपली प्रतिभा आणि कौशल्याचा वापर करुन पुढे वाटचाल केली तर देशाबरोबरच तुमचेही नाव मोठे होईल, असेही मुर्मू म्हणाल्या. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे प्रामुख्याने उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ठ शैक्षणिक कामगिरीसाठी ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रशासकीय इमारतीचे ‘ऑनलाईन’ भूमिपूजन

राष्ट्रपतींच्या हस्ते अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राची ही आपली पहिलीच यात्रा असून या दौऱ्यादरम्यानचा पहिलाच कार्यक्रम युवा पिढीशी निगडित असणारा दीक्षांत समारोह आहे, असेही सांगितले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. या समारोहाला लोकप्रतिनिधी, सिनेट व व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांचे संस्थापक, प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Story img Loader