अकोला : कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीचे ‘कपलिंग’ तुटल्याची घटना अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे फाटकाजवळ बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
बडनेरावरून भुसावळकडे कोळसा वाहून नेणारी मालगाडी निघाली होती. ही मालगाडी अकोला शहरातील न्यू तापडिया नगर रेल्वे फाटकाजवळ आली असताना अचानक एका डब्याचे ‘कपलिंग’ तुटले. त्यामुळे इंजिनसह निम्मे डब्बे पुढे निघून गेले. मागे ३५ डब्बे सुटले होते. तात्काळ याची माहिती लोकोपायलटला देऊन गाडी थांबवण्यात आली. या घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पुढे गेलेली गाडी पुन्हा मागे आणून दुरुस्तीचे कार्य युद्ध पातळीवर करण्यात आले. ‘कपलिंग’ जोडून मालगाडी अकोला रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली. दरम्यान, नागपूर-मुंबईदरम्यानची मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या घटनेमुळे रेल्वे फाटक बंद असल्याने न्यू तापडिया नगरकडे जाणारी वाहतूक देखील प्रभावित झाली.