बँकेत असलेल्या पतीच्या सहकाऱ्याशी जुळलेल्या प्रेमसंबंधातून महिलेला मुलगी झाली. त्या मुलीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी प्रियकराने दर्शविली. हे संबंध तब्बल २० वर्ष चालले. मात्र, महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याने महिलेशी दुरावा निर्माण केला. तो त्याच्यामुळे जन्मलेल्या मुलीलाही मदत करायला तयार नव्हता. त्यामुळे त्या मुलीने आत्महत्येचा विचार केला. मात्र, भरोसा सेलने तिचे समूपदेशन केले. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटी तिच्या मूळ पित्याला मुलीच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारावीच लागली.

संजय आणि शिल्पा (काल्पनिक नाव) यवतमाळातील नवविवाहित दाम्पत्य. संजयला बँकेत नोकरी लागली. त्याची बँकेत अमितशी (काल्पनिक नाव) मैत्री झाली. एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. दरम्यान, अमितची वाईट नजर शिल्पावर पडली. संजयला दारुची सवय असल्यामुळे तो बराच वेळ आणि पैसा दारूवर खर्च करीत होता. संजय आणि शिल्पाचे वाद झाल्यास अमित दोघांचीही समजूत घालत होता. त्यातून अमितने शिल्पाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघेही आपापला संसार सांभाळून प्रेमसंबंध कायम ठेवत होते. शिल्पा अमितकडून गर्भवती झाली आणि तिने पतीला न सांगता गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अमितने बाळाला जन्म देण्याचा सल्ला देऊन भविष्यातील जबाबदारी घेण्याची हमी दिली. शिल्पाला मुलगी झाली. दिलेल्या शब्दाप्रमाणे अमितने तिची काळजी घेतली आणि व्यवस्था केली. यादरम्यान, शिल्पाचा पती संजयचा आजारापणात मृत्यू झाला. त्यानंतर शिल्पा आणि अमितने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही मुलीला आई-वडिलांप्रमाणे सांभाळले.

…अन् दुरावा वाढला –

शिल्पाची मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही २० वर्षांची झाली तर शिल्पाला कर्करोगाने ग्रासले. दरम्यान अमित दोघींशीही दुरावा निर्माण करून आपल्या संसारात रमला. दोघीही मायलेकी आर्थिक परिस्थितीने खचल्या. शिल्पाने अमितला मदतीसाठी याचना केली. परंतु, त्याने नकार दिला. शिक्षण घेत असलेल्या रियाला नोकरी नाही तर आई आजारी, अशा स्थितीत रियाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

अखेर न्यायालयातून न्याय –

खचलेल्या स्थितीत रियाने शेवटचा पर्यांय म्हणून भरोसा सेल गाठले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी मायलेकीची समजूत घालत समूपदेशन केले. कायद्याच्या चौकटीत अमितशी चर्चा केली. त्याने सहकार्यास नकार दिल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयात मुलगी आणि आई या दोघींची बाजू सकारात्मकपणे मांडण्यात आली. न्यायालयाच्या दणक्यानंतर अमितने रिया ही त्याचीच मुलगी असल्याचे मान्य करीत तिच्या भविष्यासाठी व लग्नासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Story img Loader