नागपूर : पतंग पकडण्याच्या नादात कालव्यात वाहून गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा  मृतदेहच आढळला. अग्निशमन दल आणि कोराडी पोलिसांनी दोन दिवस सलग मृतदेहाचा शोध घेतला. अखेर जगदीश खरे यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात यश आले.  दयाशंकर अवधेश प्रजापती (८, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे.अवधेत प्रजापती हे मोलमजुरी करतात. त्यांना दयाशंकर (८) आणि कैलास (१२) अशी दोन मुले आहेत. बुधवारी दुपारी ते पतंग उडवायला घराबाहेर पडले. दोघेही महादुलाजवळील मैदानावर गेले. त्यांची पतंग कुणीतरी कापली. त्यामुळे ते कालव्याच्या शेजारी बसले होते. काही वेळात एक कापलेली पतंग खाली येत होती. ती पतंग पकडण्यासाठी दया आणि कैलास हे दोघेही पळायला लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, पतंगाच्या नादात दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. काही नागरिकांना ते पाण्यात गटांगळ्या खाताना दिसले. नागरिकांनी मदतीस धाव घेईपर्यंत दयाशंकर  वाहून गेला. नागरिकांनी कैलासला  वाचवले. माहिती मिळताच कोराडी पोलिसांचे पथक पोहचले. एसीपी संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वातील पथक वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत होते. गेल्या दोन दिवसांपासून मृतदेह सापडत नव्हता. शेवटी जगदीश खरे यांना शुक्रवारी सायंकाळी बोलाविण्यात आले. त्यांनी चार तास परिश्रम घेतले. अखेर कोराडी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ मृतदेह गवसला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dead body of an eight year old boy was found washed away in the canal nagpur adk 83 amy