भंडारा : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा आज सकाळी मृतदेहच आढळला. साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. श्रद्धा किशोर सिडाम (८) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती तिसऱ्या वर्गात शिकत होती.
सोमवरी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास शाळेतून आल्यावर श्रद्धा घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र, उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा खुर्द गाठले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नव्हता.
हेही वाचा: ‘’एसटी’तील पैसेकांड, लालपरीचे ‘स्टेअरिंग’ अर्धशिक्षित चालकांच्या हाती!
आज, बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तो श्रद्धाचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.