लोकसत्ता टीम
नागपूर: राज्यातील बऱ्याच भागात तापमान वाढल्याने राज्याची वीजेची मागणी शुक्रवारी २७ हजार मेगावॅटवर गेली आहे. ही मागणी आणखी वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकार करत आहे.
राज्यात शुक्रवारी (२ जून) दुपारी ४.३० वाजता वीजेची मागणी २७ हजार ३० मेगावॅट होती. त्यापैकी राज्यात १६ हजार ४५८ मेगावॅट वीज निर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला १० हजार ३०३ मेगावॅट मिळत होते. राज्यात तयार होणाऱ्या विजेपैकी महानिर्मितीच्या औष्णिक व गॅस वीज निर्मिती प्रकल्पातून ६ हजार २७१ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून १,४९३ मेगावॅट वीज मिळत होती. अदानीकडून २,५१९ मेगावॅट, जिंदलकडून ८६६ मेगावॅट, रतन इंडियाकडून १,२५३ मेगावॅट आणि इतर असे मिळून खासगी कंपन्यांकडून राज्याला एकूण ७ हजार ४५० मेगावॅट वीज मिळत होती.