महेश बोकडे
नागपूर : शासकीय वा खासगी दंत महाविद्यालयांमध्ये सध्या संस्थास्तरावर बरेच संशोधन होतात. परंतु, आता वैद्यकीय शिक्षण खात्याने बहुकेंद्रीय संशोधनावर भर दिला आहे. त्यासाठी एक पोर्टल विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे एकाच वेळी राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालयांत संशोधन होईल.
तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने कर्करोगाचा सर्वाधिक धोका असल्याचे नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने संशोधनातून सिद्ध केले व त्यानंतर शासनाने राज्यात पानमसाला, गुटख्यावर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. संशोधनासाठीचे रुग्ण हे स्थानिक रुग्णालयात राहत असल्याने ते एकाच जिल्ह्यातील जास्त दिसतात. हे चित्र बदलून संशोधनाला मोठे स्वरूप देण्यासाठी एका पोर्टलची निर्मिती होणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याचे सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे यांनी नागपुरात झालेल्या दंतविषयक संशोधनाच्या अनुषंगाने आयोजित परिषदेत अशा संशोधनात्मक पोर्टलवर भाष्य केले होते.
हेही वाचा >>>“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझा ‘गेम’ करण्याचा आदेश दिला होता” आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप
जुने संदर्भ मिळवणे शक्य
पोर्टलद्वारे राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालयांत एकाच वेळी संशोधन होईल. त्याच्या सर्व नोंदी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या प्रस्तावित पोर्टलमध्ये अपलोड होतील. संस्था स्तरावरील सर्व संशोधन या पोर्टलमध्ये असेल. त्यामुळे इतर संस्थेतील विद्यार्थी वा शिक्षकांना एखाद्या विषयात संशोधन करायचे असल्यास जुन्या संशोधनाचा संदर्भ मिळवता येईल.