नागपूर : ‘जी-२०’ राष्ट्रसमूहांतर्गत ‘सी-२०’ या कार्यगटाच्या दोन दिवसीय परिषद सोमवारपासून येथे होणार आहे. यात देश-विदेशातील विविध नागरी संस्था संघटनांचे प्रतिनिधी विचारमंथन करणार आहेत. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे दुपारी ३ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.
‘जी-२०’ परिषदेचे यजमानपद यंदा भारताकडे असून त्यानिमित्त देशभर विविध महानगरांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकीच ‘सी-२०’ समूहाची प्रारंभिक परिषद २० ते २२ मार्च दरम्यान नागपुरात होत आहे. उद्घाटनाला आध्यात्मिक नेत्या व ‘सी-२०’ च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्यासह नोबल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे, संयुक्त राष्ट्रांचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह उपस्थितीत राहणार आहेत. २० आणि २१ तारखेला होणाऱ्या परिषदेत आरोग्य, पर्यावरण, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक जीवनशैली, कला आणि हस्तकला यांसारख्या मुद्दयांवर चर्चा केली जाईल. चर्चेतून तयार होणारे प्रस्ताव ‘जी-२०’ सचिवालयाला प्रदान केले जातील आणि ३० व ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर येथे होणाऱ्या ‘सी-२०’च्या शिखर परिषदेत मांडण्यात येतील, अशी माहिती ‘सी-२०’ चे सोस शेर्पा डॉ. स्वदेश सिंग यांनी दिली. परिषदेसाठी सुमारे एक हजार प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातील २५ संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
३०० प्रतिनिधींचा सहभाग
परिषदेत जी-२० देशांतील नागरी संस्थांचे ६० प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशांचे असे एकूण ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेत स्थानिक मुद्दयांवर चर्चा व्हावी म्हणून ‘नागपूर व्हॉइस’ उपक्रम राबवण्यात आला होता. त्यासाठी ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यात नागपूर व विदर्भात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरी संस्थांना या उपक्रमांतर्गत सूचना व मते मागवण्यात आली होती. संस्थांकडून प्राप्त सूचना ‘सी-२०’च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्याकडे निवेदन स्वरूपात सुपूर्द करण्यात येणार आहे.
‘सी-२०’ काय आहे?
सिव्हिल-२० (सी-२०) हा नागरी समाज संस्थांचा गट आहे. याची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली होती. सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर ‘जी-२०’ ला हा गट शिफारशी करतो. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम या गटाद्वारे केले जाते. जगभरातील अशासकीय, सेवाभावी, नागरी समाज संस्थांना या गटामुळे जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथे झालेल्या ‘जी-२०’ गटाच्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा चांगला अहवाल जगभरात पोहोचला आहे. तसाच सकारात्मक अहवाल हा नागपूरचाही जायला हवा.