लोकसत्ता टीम
अमरावती: विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथील स्काय वॉकच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला केंद्रीय वन्यजीव मंडळाने काही अटी व शर्तींवर स्काय वॉकच्या उभारणीला परवानगी दिली आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित काम सुरू होईल, अशी माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.
हरिकेने पॉइंट ते गोरेघाट पॉइंटच्या दरम्यान उभारण्यात येत असलेल्या स्काय वॉकच्या खाली दरीत वाघासह विविध वन्यप्राण्यांचा संचार आहे. त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे कारण पुढे करून स्काय वॉकचे काम रोखण्यात आले होते. चिखलदऱ्यातल्या हरिकेन ते गोराघाट या पॉइंट दरम्यान ४०७ मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा स्काय वॉक सिडकोच्या वतीने साकारला जात आहे. सिडकोने चिखलदरा आणि अमरावती येथील वन विभाग, व्याघ्र प्रकल्प विभागाची परवानगी घेऊन या प्रकल्पाला सुरुवात केली. मात्र, जुलै २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूरच्या कार्यालयाने काही त्रुटी काढून परवानगी नाकारली होती. तेव्हापासून काम थांबले होते.
हेही वाचा… खळबळजनक! १४ पिस्तुल, ८० जिवंत काडतुसे, २५ मॅगझीन जप्त; बुलढाण्यात ठाणे पोलिसांची धडक कारवाई
चिखलदऱ्यात होणारा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे तर देश – विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, असा अंदाज आहे. हा स्काय वॉक २०१८ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. यासाठी ३४.३४ कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच राखीव वन क्षेत्रात विकसित करण्यात येत आहे. वन (संवर्धन) अधिनियम, १९८० आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत सिडकोने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय वन मंत्रालयाने काही अटी आणि शर्तींसह १९ जानेवारीला परवानगी दिली होती. आता केंद्रीय वन्यजीव मंडळानेही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. या प्रकल्पाला सिडकोकडून वित्तपुरवठा करण्यात येत असून स्काय वॉकचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे.