गोंदिया: गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे संयुक्त असताना ८० च्या दशकात स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाद्वारे शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. मात्र, नंतर ते बंद झाले. यावर्षी जिल्हा परिषदेने बिट, तालुका आणि जिल्हा असे कार्यक्रम आखून देत अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव असे नाव दिले. यांची जिल्हा स्पर्धा २२ ते २४ डिसेंबर दरम्यान गोंदियात होणार असून बक्षीस वितरण मात्र गोरेगावात होणार आहे. या कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रीय मंत्री हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खेळाकरिता वळवलेल्या शासकीय निधीतून राजकीय कार्यक्रम करण्याचा डाव तर नाही ना! अशी चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्हा १९९९ पूर्वी भंडारा जिल्ह्यातच होता. त्याचे विभाजन १ मे १९९९ रोजी तत्कालीन अर्थमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर यांच्या प्रयत्नाने झाले. दोन्ही जिल्हे एकत्र असताना एका गुरुजीच्या डोक्यातून सूचलेल्या कल्पनेतून शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची वाट मोकळी करून देण्यासाठी स्वदेशी क्रीडा स्पर्धांची संकल्पना साकारण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेने केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरीय निधी देखील आखून दिला होता. तो कित्ता गेल्या दोन वर्षा पूर्वीपर्यंत सुरू होता. मात्र, करोना काळानंतर तो बंद केला. त्या स्पर्धांमध्ये मोठा लोकसहभाग होता. यावर्षी गोंदिया जिल्हा परिषदेने तीच स्पर्धा पुन्हा सुरू केली. मात्र त्याचे नामकरण अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव असे केले. यातून मात्र लोकसहभाग हा भाग वगळून सर्व प्रशासकीय स्तरावर आयोजन केले.

हेही वाचा… “करू वा मरू, पण विदर्भ राज्य मिळवूच!” वामनराव चटप यांचा निर्धार; २७ डिसेंबरला विदर्भात…

त्यासाठी देखील ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली. केंद्र वगळून बिट हा नवीन प्रकार सुरू झाला. बिट, तालुका आणि जिल्हा असे त्याचे स्वरूप आहे. बिटाकरिता ४० हजार, तालुका ८० हजार आणि जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी ८.२० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. बिटस्तरीय सामने अंतिम टप्यात आहेत. तर तालुकास्तरीय सामने १८ डिसेंबरपासून होणार आहेत. जिल्हा महोत्सव २२ ते २४ डिसेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकूल गोंदिया येथे पार पडणार आहेत. मात्र, त्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम गोरेगावातील शहीद जान्या- तिम्या शाळेच्या आवारात होणार आहे.त्यासाठी भव्यदिव्य आयोजन सुरू आहे.

हेही वाचा… वाशिम: मागास समाजावर अन्याय, अत्याचार सुरूच! दहशतीमुळे महिला, लहान मुलांसह अनेकांनी सोडले गाव

गोरेगावातील कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रीय मंत्र्यांसह मोठी राजकीय मंडळी हजेरी लावणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा सर्व कार्यक्रम राजकीय खेळी करण्यासाठी तर खेळला जात नाही?, स्वदेशीचे अटल नावकरण्याचे कारण काय आणि यातून लोकसहभाग वगळण्याचे कारण काय? त्याचबरोबर स्पर्धा एका ठिकाणी आणि बक्षिस वितरण दुसऱ्याच ठिकाणी हे गणित मांडण्यामागचे कारण काय? असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The district competition will be held in gondia and the prize distribution will be held in goregaon sar 75 dvr