लोकसत्ता टीम
वर्धा: श्वासही घेणे कठीण झालेल्या नांदेडच्या युवकास शस्त्रक्रिया करीत मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात सावंगीच्या डॉक्टरांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील १९ वर्षीय युवक रूग्ण नाकातून सतत रक्तस्त्राव होत असल्याने सावंगीच्या विनोबा भावे रूग्णालयात दाखल झाला होता. कान, नाक व घसा विभागातील तज्ञांनी तपासणी केल्यावर त्याला नाकावाटे श्वास घेणेही कठीण झाल्याचे दिसून आले.
नाकात रक्ताची गाठ म्हणजेच ‘ॲंजीओफ्रायब्रोमा’ हा विकार झाल्याचे स्पष्ट झाले. रूग्णाच्या जांभाड्याला चिरा देवून ही अतिशय जटील अशी शस्त्रक्रिया केली जाते. अतिरक्तस्त्रावामुळे रूग्णाच्या जीवाला यात धोकाही असतो. यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ.सागर गौरकर व डॉ.चंद्रवीर सिंग यांनी घेतला.
हेही वाचा… अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती; महाराष्ट्रालाही बसणार फटका!
रेडिओलॉजिस्ट डॉ.पंकज बानोदे, डॉ.शुभम व डॉ.प्रचिता यांची मदत घेत नाकातील गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीचा प्रवाह खंडीत करण्यात आला. ही प्रक्रिया आटोपल्यावर डॉ.फरहद खान, डॉ.आयुषी घोष, डॉ.गौतम, डॉ.अभिजीत शर्मा, डॉ.निमिषा पाटील, डॉ.जसलीन कौर, डॉ.परिणीता शर्मा, डॉ.हर्षल दाेबारिया, डॉ.जया गुप्ता व डॉ.स्मृती यांच्या चमूने दुर्बीणीद्वारे व कॉब्लेटरच्या सहाय्याने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. कमीतकमी रक्तस्त्राव व वेदनारहित उपचार झाल्याने रूग्ण व त्याच्या परिवाराने आनंद व्यक्त केला. शस्त्रक्रियेसाठी फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाल्याने रूग्णास कोणताच खर्च आला नाही. व्याधीमुक्त होत रूग्ण घरी परतल्याचे विभागप्रमुख डॉ.प्रसाद देशमुख यांनी सांगितले.