वर्धा: भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी आयोगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व पात्र विद्यार्थ्यांची शाळेतच मतदार म्हणून नोंदणी करण्याची विनंती शिक्षण विभागास केली होती. आता तशी सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना केली आहे.
सर्व शाळेतील वर्ग नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळातर्फे पूनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नवीन मतदार म्हणून नोंदणी अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे १ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होत आहे, अशा विद्यार्थ्यांकडून पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात यावे, अशा सूचना आहेत.
हेही वाचा… रेशन लाभार्थ्यांना उद्यापासून आनंदाचा शिधा! गोंदिया जिल्ह्यात २.२० लाख किट उपलब्ध
ऑनलाईन माध्यमातून नवीन मतदार नोंदणीसाठी विविध उपक्रम राबवावेत,असे सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध करून घ्यावे. ते विद्यार्थ्यांकडून भरून घेत कार्यालयास सादर करायचे आहेत.