गडचिरोली : मागील अडीच वर्षांपासून ओडिशावरून आलेल्या रानटी हत्तींनी गडचिरोलीच्या सीमाभागात बस्तान मांडले आहे. अधूनमधून मानवी वस्त्यांवर त्यांचे होणारे हल्ले आणि शेतीचे नुकसान यामुळे उत्तर गडचिरोलीतील कोरची, कुरखेडा तालुक्यात सध्या दहशतीचे वातावरण आहे.
२ ऑगस्ट रोजी रानटी हत्तींच्या कळपाने मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी गावावर हल्ला करून १४ घरे जमीनदोस्त केली. दरम्यान गावातील नागरिकांनी मुलाबाळांना घेऊन सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, अजूनही धोका कायम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.
हेही वाचा – खबरदार! गोठ्यातील जनावर वर्दळीच्या रस्त्यावर सोडल्यास…
वनविभागाने तात्काळ पंचनामा करून पीडितांना साडेसहा लाखांची नुकसान भरपाईदेखील वाटप केली आहे. दरम्यान कुरखेडा तालुक्यातील अनेक भागांत या रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच असून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काही काळ हे हत्ती लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्याने गडचिरोलीत शांतता होती. मात्र, पुन्हा हत्तींनी प्रवेश केल्याने वनविभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.