लाखांदूर तालुक्यात दाखल झालेले हत्ती पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. हत्तीचा कळप पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली आणि त्याचवेळी कळपातील एका हत्तीने दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे उडवून पायाखाली तुडवले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
हेही वाचा >>>कसा आहे समृध्दी महामार्गाचा आरंभ बिंदू?; एक किलोमीटर क्षेत्र, रांगोळीचा आकार आणि बरेच काही
दोन दिवसांपूर्वी रानटी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात दाखल झाला. दहेगाव येथे घरांची तोडफोड केली. दरम्यान, गुरुवारी सकाळी हत्ती लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढादरम्यान असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेक जण हत्ती पाहण्यासाठी या मार्गावर पोहचले. सुरेश दिघोरे हेही एका सहकाऱ्यांसोबत दुचाकीने हत्ती पाहण्यासाठी गेले. त्यावेळी एका व्यक्तीने सुरेशला हत्ती आल्याचे सांगितले. गोंधळलेल्या अवस्थेत सुरेशने दुचाकी रस्त्यावर उभी केली आणि धूम ठोकली. त्यामुळे थोडक्यात त्याचा जीव वाचला.
हेही वाचा >>>“डिव्हिजनल कमिश्नर हाजीर हो…” ;लोणार सरोवर संवर्धन दिरंगाईप्रकरणी उच्च न्यायालयाचे समन्स
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून हत्तींनी लाखांदूर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. ६ डिसेंबरच्या रात्री दहेगाव (माईन्स) येथे गावात शिरून तीन घरे जमीनदोस्त केली. वनविभागाने या हत्तींच्या कळपाला जंगलात पिटाळून लावले. गुरुवारी सकाळी हा कळप इंदोरा ते मेंढा मार्गावर दिसून आला. सध्या या हत्तींच्या कळपाने इंदोरालगत असलेल्या बेलबनात मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. हत्तींना पाहण्यासाठी या परिसरात एकच गर्दी होत आहे. पोलीस विभागाने या परिसरात आता बंदोबस्त लावला असून नागरिकांना हत्तीच्या कळपापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे.