वर्धा : राज्य कर्मचारी संघाची आज निघालेली बाईक रॅली सर्वांचे लक्ष वेधून गेली. मार्च २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा संप झाला होता. नंतर झालेल्या वाटाघाटीने तो मागे घेण्यात आला. संघटनेच्या सुकाणू समितीसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी आश्वासन दिले होते.
जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरेक्षेची हमी देण्याचे धोरण तत्त्व म्हणून स्वीकारल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. त्यावर लवकर निर्णय देण्यासाठी तात्काळ त्रि-सदस्यीय अभ्यास समिती नेमून समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. समितीने विहित कालावधीत अहवाल सादर न केल्याने शासनाने परत दोन महिन्यांची मुदतवाढ दिली, असे निदर्शनास आणत संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र लोखंडे यांनी ही बाब वेळकाढूपणा असल्याचा आरोप केला.
हेही वाचा >>> विदर्भवादी आक्रमक! आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने तणाव, ‘या’ आहेत मागण्या…
कर्मचारी व शिक्षकांच्या यामुळे भावना दुखावल्या असल्याचे ते म्हणाले. आजची रॅली हा संताप व्यक्त करण्यासाठी असल्याचे शिक्षक नेते विजय कोंबे यांनी स्पष्ट केले. रॅलीचे विनोद भालतडक, मनीष ठाकरे, अटल बीडवाईक, प्रमोद खाडे, पांडुरंग भालशंकर, रेखा तडस, दिलीप गर्जे, सचिन देवगिरकर, नितीन तराले, अमोल पोले, प्रकाश बामनोटे, बाबासाहेब भोयर, आनंद मून यांनी नेतृत्व केले.