नागपूर : राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.
२०१८ मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी केले. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असे नाव दिले. दादर स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करावे, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचे नाव चैत्यभूमी करावे, अशी आग्रही मागणी डॉ. राऊत यांनी आज सभागृहात केली.
हेही वाचा >>>अकोल्यातही भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादर परिसरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादर येथील राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी राज्य शासनाला केली.
मुंबईतील आठ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता सर्वत्र स्थानकांच्या नावाबाबत संमिश्र चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी किंग्ज सर्कलच्या तीर्थंकर पार्श्वनाथ या नावाला विरोध दर्शविला आहे. तर काहींनी पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या स्थानकांत सुविधा वाढवण्याऐवजी नाव बदलण्यात सरकारला धन्यता वाटते, असा टोला लगावला आहे. या सर्व चर्चांच्या सुरू असतानाच दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आहे.
हेही वाचा >>>‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…
मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांचे नामांतर करणे काही नवीन नाही. यापूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस व नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. यासह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी असे करण्यात आले. आता नव्याने मध्य रेल्वेवरील एक, पश्चिम रेल्वेवरील तीन, हार्बर मार्गावरील तीन आणि मध्य-हार्बरवरील एक अशा आठ स्थानकांची नावे बदलली जाणार आहेत. मुंबई सेंट्रल, मरीन लाईन्स, चर्नी रोड, करी रोड, डॉकयार्ड, सँडहर्स्ट रोड, किंग्ज सर्कल आणि कॉटन ग्रीन या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.