नागपूर : राज्यात विविध पदांसाठी पदभरती सुरू आहे. दर्जेदार कंपनीकडून परीक्षा व्हावी यासाठी सरकरचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खासगी परीक्षा केंद्रावर पुन्हा एकदा गैरप्रकाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमिआर) विभागाच्या परीक्षेत १८ लाख रुपये घेत उत्तरे पुरवण्यात आली आहेत.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तशी तक्रार केली आहे. समितीने आजवर महाराष्ट्रातील मोठ-मोठे नोकर भरती घोटाळे बाहेर काढले आहेत. महापरीक्षा पोर्टल घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, टीईटी घोटाळा, म्हाड़ा पद भरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती घोटाळा- २०२३ इत्यादी नोकर पदभरती घोटाळे आम्ही समोर आणून पोलिसात अधिकृतरीत्या तक्रार देत तक्रार दाखल केल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमिआर) विभागाच्या ५,१५५ पदांच्या नोकर भरतीसाठी १२ जून ते २० जुन २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात टीसीएस द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत लातूर आणि औरंगाबाद येथील काही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे तिथे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे.लातूर येथील तीन परीक्षा केंद्रांवर केंद्र चालकांनी अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण उत्तरे पुरवून मदत केल्याचे तिथे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनीसांगितले आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १८लाख रुपये मागण्यात आले. या प्रकारामुळे माहिती अधिकारात परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले आहेत. यानंतर सत्य समोर येणार आहे.