नागपूर : २३ नोव्हेंबर १९९४ ला नागपुरातील हिवाळी अधिवेशनकाळात गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. त्यांचे मृतदेह व जखमी रुग्ण मेडिकल रुग्णालयात आले. मृतदेहांचा ढीग, शेकडो जखमी बघून आम्हीही घाबरलो होतो. परंतु, आपत्कालीन नियोजनातून जखमींवर उपचार व मृतदेहांच्या शवविच्छेदनाची सोय करण्यात आली, असा अनुभव मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. एन. के. देशमुख व त्यांच्या चमूने सांगितला.
गोवारी हत्याकांडाला २३ नोव्हेंबर २०२३ रोजी २९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त डॉ. एन.के. देशमुख आणि चमूशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, २३ नोव्हेंबर १९९४ ला संध्याकाळी सहा वाजता तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री शरद काळे यांनी दूरध्वनीद्वारे कळवले की, गोवारी बांधवांच्या मोर्चात चेंगराचेंगरी झाली. त्यातील मृतक व शेकडो जखमी मेडिकलला येणार आहेत. त्यानंतर लगेच मेडिकलचे समन्वयक डॉ. अरविंद कुऱ्हाडे यांना घरी बोलावले व मेडिकलला पोहोचलो. तेथे मंत्री शरद काळे, तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि काही वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी मला मदत मागितली. मी सगळ्याच विभागातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात बोलावले. त्यापूर्वी १११ जणांचे मृतदेह येथे पोहोचले होते. शेकडो जखमी येणार असल्याने तातडीने शल्यक्रिया गृहातील दोन वार्डासह एक बालरोग विभागाचा वार्ड आरक्षित केला. रात्री शवविच्छेदन शक्य नव्हते. येथे दोनच टेबल होते. परंतु, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरीभाऊ कानडे यांना विश्वासात घेतले. येथील शरीररचनाशास्त्र विभागाच्या सभागृहात शवविच्छेदनासाठी ५० टेबल आणि त्यावर दिव्यांची सोय केली. मेयो रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभागातून न्यायवैद्यकशास्त्रचे तज्ज्ञ मिळाल्याने शवविच्छेदनासाठी १२ चमू उपलब्ध झाल्या. १२ टेबलांवर शवविच्छेदनानंतरची प्रक्रिया सुरू होती. २४ नोव्हेंबर १९९४ च्या दुपारी १ वाजता शवविच्छेदन पूर्ण झाले. तसा अहवाल मुख्य सचिवांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना सोपवला. शेकडो किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुट्टी दिली. गंभीर १०१ रुग्णांवर उपचार झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा – नागपूर : मनसेची नासुप्रमध्ये धडक; कर्मचाऱ्याचे निलंबन…
परीक्षा काळातही विद्यार्थी मदतीला
वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा होती. परंतु, घटनेनंतर येथील सर्व विद्यार्थी अभ्यास सोडून रुग्णांच्या मदतीला धावले. कुणी पोलिसांच्या वाहनात एकावर एक ठेवलेल्या मृतदेहांना कर्मचाऱ्यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठीच्या टेबलावर ठेवत होता तर कुणी जखमींना वार्डात हलवून उपचार करत होता. वर्ग चारचे कर्मचारी आणि परिचारिकाही पूर्ण क्षमतेने सेवा देत होत्या.
डॉक्टरांनी स्वत:च्या पैशातून हजारोंचे पोट भरले
घटनेनंतर मेडिकलवर एकीकडे शेकडो जखमींवर उपचार तर दुसरीकडे १११ मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदनाचे आव्हान होते. नातेवाईक दिवसभर उपाशी होते. डॉ. देशमुख यांना कळताच त्यांच्यासह येथील सगळ्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खिशातील सर्व पैसे एका कापडात गोळा केले. त्यातून प्रथम चहा-बिस्कीट, पाण्याची सोय झाली. त्याचवेळी येथील सर्व वसतिगृहातील उपाहारगृहात पुरी- भाजी करण्याची सूचना दिली गेली. दुसरीकडे काही विद्यार्थी जवळच्या उपाहारगृहांमध्ये मदत मागायला गेले. सगळ्यांनी नि:शुल्क पुरी-भाजी दिली, अशी माहिती मेडिकलचे तत्कालीन समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद कुऱ्हाडे यांनी दिली.
हेही वाचा – लोकजागर- गडचिरोलीचा गहिवर (?)
पंधरा दिवसांत सर्व मृतदेहांची ओळख पटली
अनोळखी मृतदेहांच्या शवविच्छेदनानंतर त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान होते. २४ नोव्हेंबरच्या रात्री ८ पर्यंत ८५ मृतदेहांची ओळख पटली. ते मृतदेह नातेवाईकांना सोपवले. २५ नोव्हेंबरला १० मृतदेहांची ओळख पटली. शेवटी पंधराव्या दिवशी शेवटच्या दोन मृतदेहांची ओळख पटून तेही मृतदेह नातेवाईकांना सोपवले गेले. तीन दिवसांहून जास्त मृतदेह ठेवता येत नव्हते. परंतु, कुणीही शासकीय मदतीपासून वंचित राहू नये व नातेवाईकांना मृतदेह मिळावा म्हणून आम्ही काही नियमांत शिथिलता दिली, अशी माहिती तत्कालीन न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिभाऊ कानडे यांनी दिली.
नेत्यांपेक्षा रुग्णसेवेला जास्त महत्त्व
मेडिकलमध्ये राजकीय पर्यटन सुरू झाले. परंतु आमचे प्राधान्य उपचारला होते. दुसरीकडे सतत तीन दिवस वेळ-काळ न बघता डॉक्टर-कर्मचारी काम करत असल्याने त्यांनाही प्रोत्साहित करत होतो. काही नेत्यांशी संवाद साधला नसल्याने ते नाराज झाले. कालांतराने राज्यात सत्तांतरण झाल्यावर हा राग मनात धरून मला निलंबित केल्याची खंतही डॉ. एन.के. देशमुख यांनी बोलून दाखवली. परंतु, या आपत्तीत सेवा देणाऱ्या मेडिकलच्या सगळ्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांना पत्र देऊन त्यांचा गौरव केल्याचेही ते म्हणाले. नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या २९ वर्षांत सरकार वा इतर संस्थांनी गोवारी प्रकरणात मेडिकलच्या कामाकडे दुर्लक्ष केले. परंतु ‘लोकसत्ता’ने या कामाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.