चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील तिरवंजा मोकासा येथील येरगुडे कुटुंबाने शेतीत राबणाऱ्या आपल्या बैलाचा सांभाळ केला. कुटुंबाचा सदस्यच असल्यासारखा लखनही दिवसभर शेतीतली कामे करत मजेत राहू लागला. मात्र वार्धक्यामुळे २२ वर्षीय लखनचा अंत झाला. येरगुडे कुटुंबासोबतचे लखनचे असलेले नाते अवघ्या क्षणात संपुष्टात आले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र येरगुडे परिवाराने लखनचे अंत्यसंस्कार करत तेरावीही पार पाडली. या अनोख्या घटनेची सर्वदूर चर्चा असून लखनच्या मृत्यूच्या बातमीने नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोजराज येरगुडे या शेतकरी कुटुंबाने काही वर्षांअगोदर एक वासरू खरेदी केले होते. या वासरावर जिवापाड प्रेम करत कुटुंबातील सदस्याप्रमाणेच लहानाचे मोठे केले. त्याला प्रेमाने लखन हे नावही दिले. २२ वर्षे वय असलेल्या लखनचे १५ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. या घटनेमुळे येरगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र या दु:खातून सावरत कुटुंबियांनी लाडक्या लखनवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. आयुष्यभर काबाडकष्ट करून मातीतून सोनं पिकविणाऱ्या लाडक्या लखनच्या देहाची मृत्यूनंतर विटंबना होऊ नये याची काळजी घेत कुटुंबियांनी भजन मंडळी व बँडच्या साथीने लखन राजा अमर रहे या घोषणेत लखनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा – वर्धा : विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू, शेतमालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

हेही वाचा – चूल, मूल अन् शिक्षणही; दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन आई परीक्षा केंद्रावर, महिला पोलिसाने तान्हुल्याला सांभाळले

पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या लखनच्या स्मृती प्रित्यर्थ १८ फेब्रुवारी रोजी तेरावीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रकाश साखरे, सुभाष साखरकर, जीवन गोहणे, राकेश येरगुडे, यशवंत येरगुडे, भोजराज येरगुडे, आनंदराव येरगुडे, देवराव येरगुडे यांच्यासह गावकरी व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रत्येक बळीराजाचा ऊर अभिमानाने दाटून यावा अशी ही घटना आहे. मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेत येरगुडे कुटुंबियांनी लाडक्या लखनकरिता दाखविलेले प्रेम, माणूसकी ही इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The farmer family performed the last rites and teravi of the beloved ox incident in bhadravati taluka of chandrapur district rsj 74 ssb