पत्नीसह सासरच्या मंडळीला खोट्या गुन्ह्यात गुन्ह्यात फसविण्यासाठी एका व्यक्तीने स्वत:च्या मुलीला गळफास दिला. वडिलांनी मुलीच्या हातून चिठ्ठी लिहून त्यात तिची सावत्र आई, मामा आणि आजी-आजोबांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहून घेतले. गुड्डू छोटूलाल रजक (४५, कळमना गाव) असे आरोपीचे नाव आहे. गुड्डूने सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मोठी मुलगी माही हिला सावत्र आई, मामा, मामी यांना फसविण्यासाठी आत्महत्या करण्याचा बनाव करण्यास सांगितले. ६ नोव्हेंबरला माही आणि तिची बहीण या दोघींना गुड्डूनेझोपेतून उठवले. माहीला ‘सुसाईड नोट’ लिहिण्यास सांगितले.
तिचे गळफास लावलेल्या अवस्थेत छायाचित्र काढण्यासाठी तिला टेबलवर उभे केले आणि गळ्यात दोरी लावली. छायाचित्र काढल्यानंतर गुड्डूने टेबलला लाथ मारली. त्यामुळे माहीला गळफास लागला. या प्रकरणी कळमना पोेलिसांत खोटी तक्रार देऊन पत्नी कौशल्या, दशरथ पिपरडे, कल्पना पीपरडे आणि संतोष पिपरडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. कळमन्याचे ठाणेदार विनोद पाटील यांनी घटनास्थळ आणि आत्महत्येचा बनाव केल्यानंतर काढलेल्या फोटोचा अभ्यास केला असता क्राईम पेट्रोल बघून हा कट रचल्याचे उघडकीस आले.