लोकसत्ता टीम
नागपूर: येत्या पाच मे रोजी भारतातून छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातुन दिसणारे हे यावर्षीचे पाहिले ग्रहण असेल. या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (Penumbra)जात असल्याने चंद्र किंचित अंधुक होतो म्हणून त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.
२० एप्रिलला अतिशय सुरेख असे हायब्रीड सुर्यग्रहण झाले होते परंतु ते भारतातून दिसले नाही. पाच मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण फारसे सुंदर दिसत नसले तरी खगोलीय दृष्टीने महत्वाचे आहे. खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो. त्यामुळे चंद्र काळा, लाल दिसतो. छायाकल्प चंद्रग्रहणात मात्र चंद्र काळा, लाल दिसत नाही.
आणखी वाचा- अनेक दिवसांनंतर आकाशात प्रकाशाचा खेळ अन् नवरंगी उधळण
तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येते तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात. चंद्र ग्रहणवेळी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावली असतात. गडद सावली आणि उपछाया. गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते.
हे चंद्रग्रहण कुठून दिसेल?
हे छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पेसिफिक, इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल.
ग्रहण केव्हा दिसेल?
हे ग्रहण पाच मे रोजी भारतीय वेळेनुसार ८.४४ वाजता सुरवात होईल. ग्रहणाचा मध्य १०.५२, तर ग्रहण समाप्ती १.१ वाजता होईल.
निरीक्षण कसे करावे?
आकाश ढगाळ नसेल तर साध्या डोळ्याने घरूनच ग्रहण बघावे. दुर्बीण किंवा द्विनेत्रीं असल्यास उत्तम, असे स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे म्हणाले.