अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आत क्षतिग्रस्त झाला.आता गेल्या सात महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. या क्षतिग्रस्त पुलाची ग्रीन ब्रिगेडच्यावतीने रविवार, २३ जुलै रोजी महाआरती करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आता १९ डिसेंबर २०२२ रोजी खचला. या मार्गाखालून गेलेली ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला. परिणामी, हा मार्ग बंद करावा लागला.
हेही वाचा >>>महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी निलंबित, कारण काय वाचा…
गेल्या सात महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. अद्यापही हे कार्य पूर्ण झाले नसल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ,खचलेल्या उड्डाणपूल प्रकरणांत काँग्रेस नेते व ग्रीन ब्रिगेडचे विवेक पारसकर यांनी शासन व प्रशासनावर टीका केली आहे. बिनकामाच्या उड्डाणपुलाला दीर्घायुष्य लाभो, असा उपरोधात्मक टोला त्यांनी लगावला. २३ जुलैला दुपारी ४.३० वाजता ग्रीन ब्रिगेडच्यावतीने उड्डाणपुलाची महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.