नागपूर: सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम डिसेंबरपर्यत चालणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
सणासुदीच्या काळात मिठाईच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे या काळात भेसळीचे प्रमाण वाढते. हा प्रकार टाळण्यासाठी विक्रेत्याना अन्न व औषध प्रशासन विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. कच्चा माल परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावा, खरेदीचे देयक सांभाळून ठेवावीत, कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाईत मर्यादित स्वरुपात रंगाचा वापर करावा यासह अन्य सूचनांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा… बुलढाणा: नादुरूस्त बस घेऊन जाणाऱ्या एसटीला मालवाहूची धडक; चालक ठार
ग्राहकांना मिठाई किंवा अन्य अन्न पदार्थाविषयी तक्रार असल्यास त्यांनी १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.