नागपूर : राज्यात गेल्या पाच दशकात उपराजधानीने उष्णतेच्या सर्वाधिक लाटा अनुभवल्या आहेत. या काळात मे महिन्यात सर्वाधिक १०७ वेळा उष्णतेच्या लाटा अनुभवणारे नागपूर हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. या शहराने गेल्या अनेक दशकातील सर्वात उष्ण एप्रिल महिना देखील अनुभवला आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा उष्माघात कृती आराखडा आतापर्यंत तयार व्हायला हवा होता. मात्र, अजूूनही सूचनांव्यतिरिक्त ठोस आराखडा तयार झालेला नाही.
उपराजधानीला दरवर्षी उन्हाचा तडाखा बसतो. मधली दोन वर्षे टाळेबंदीमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे वाढत्या उन्हाचा परिणाम जाणवला नाही. तसेच उष्माघात कृती आराखडा तयार केला किंवा नाही, याकडेही कोणी लक्ष दिले नाही. आता मात्र हवामान खात्यासह अभ्यासकांचेही तापमानवाढीचे भाकित समोर येत आहेत. शहरात येत्या मार्च महिन्यात ‘जी-२०’ परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे देशविदेशातून पाहुणे शहरात येणार आहेत. नागपूरकरांना या वाढत्या उन्हाची सवय आहे, पण पाहुण्यांना हे ऊन झेपेल का, हाही एक प्रश्न आहे. एकीकडे शहरात ‘जी-२०’च्या पार्श्वभूमीवर उष्माघात कृती आराखड्याच्या दृष्टीने देखील शहर सज्ज असायला हवे होते. मात्र, यादृष्टीने महापालिकेने अजूनही तयारी केलेली नाही. पुढील आठवड्यात आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी या शहराचे तापमान उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही अधिक जाते. विकास कामासाठी वृक्षतोड झाल्याने शहरातील हिरवळ कमी झाली. त्यामुळे सायंकाळी थंड होणारे हे शहर आता उष्णच राहते. उष्णतेच्या लाटांपेक्षाही सायंकाळच्या उष्ण झळा या न सोसवणाऱ्या असतात. या उन्हाचा सर्वाधिक फटका भिकारी, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना बसतो. तसेच चौकाचौकात वाहतूक दिवा लागल्यानंतर वाहने थांबतात. काही वर्षांपूर्वी शहरात चौकांमध्ये उंचावर हिरवे आच्छादन लावण्याचा प्रयोग करण्यात आला होता, पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर मात्र लाल दिवा लागल्यानंतर चौकात थांबणाऱ्या वाहनचालकांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. शहरात तसेही वाहतुकीचे नियम मोडून जाण्याचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात ते अधिक घडतात. त्या पार्श्वभूमीवर व्यवस्था होणे गरजेचे आहे. याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम, विकास कामे सुरू आहेत. त्या कामगारांसाठी अजून कोणत्याही सूचना नाहीत. गेल्या काही वर्षात सार्वजनिक पाणपोईंची संख्या कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघात कृती आराखडा गांभीर्याने तयार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.